आयपीएलमध्ये नवखे खेळाडू लक्ष वेधून घेत आहेत. आरसीबीचा युवा यष्टिरक्षक, फलंदाज के. एस. भरत याने ३५ चेंडूंत ४४ धावा काढून कौशल्य सिद्ध केले. आंध्रच्या विशाखपट्टणमचा असलेल्या भरतला बालपणापासून क्रिकेटचे वेड होते. गल्ली क्रिकेटमध्ये मित्रांसोबत त्याने शेजाऱ्यांच्या खिडक्यांच्या अनेकदा काचा फोडल्या.
शेजारी वडिलांकडे तक्रार करायचे. त्यांनी कंटाळून त्याला क्रिकेट अकादमीत भरती केले. भरतमधील कलागुणांचा योग्य उपयोग व्हावा, अशी त्यांची भावना होती. शाळेत जाण्याचा कंटाळा यायचा, त्यासाठी भरतने क्रिकेटमध्ये सकाळी ९ ते दुपारी ४ असा सराव सुरू केला. तो अभ्यासातही हुशार होता.
२०१५ ला रणजी करंडकात ३११ चेंडूंत ३८ चौकार आणि सहा षट्कारांसह ३०९ धावा ठोकणारा भरत हा तिहेरी शतक झळकविणारा एकमेव फलंदाज आहे. तो म्हणाला, ‘वयाच्या १६ व्या वर्षी फलंदाज म्हणून भरतची आंध्र संघात निवड झाली. त्याचवेळी घरून विचारणा झाली की पुढे क्रिकेट किंवा अभ्यास यापैकी एकाची निवड कर. मी क्रिकेटमध्ये करिअर करण्याचे ठरविले. पुढच्या वर्षी कोच कृष्णा राव यांनी यष्टिरक्षणात हात अजमावण्याचा सल्ला दिला. मी त्यांची सूचना पाळली. १९ वर्षांखालील राज्य संघात मला यष्टिरक्षक - फलंदाज म्हणून स्थान मिळाले.’
धोनी, गिलख्रिस्ट आदर्श खेळाडूमहेंद्रसिंग धोनी आणि ॲडम गिलख्रिस्ट हे भरतचे आदर्श खेळाडू. दोघांच्याही सामन्यांचा व्हिडिओ पाहूनच भरत यष्टिरक्षणात तरबेज झाला. फलंदाजीत विराट कोहलीचे फटके मारण्याचे कौशल्य त्याला फारच पसंत आहे.
फिनिशर्ससाठी भक्कम स्थिती तयार करण्याची माझी जबाबदारी ‘एबी डीव्हिलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेल यांसारख्या धडाकेबाज फलंदाजांना फटकेबाजीसाठी उपयुक्त अशी भक्कम स्थिती तयार करण्यात यशस्वी ठरत असल्याचा आनंद आहे. या दोन्ही फिनिशर्ससाठी उपयुक्त परिस्थिती निर्माण करणे हीच माझी जबाबदारी आहे,’ असे मत रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (आरसीबी) यष्टिरक्षक-फलंदाज श्रीकर भरत याने व्यक्त केले. ‘फलंदाजीसाठी तिसरा क्रमांक खूप चांगला आहे. जर या स्थानासाठी तुम्ही तयार नसाल, तर तुमच्यासमोर अनेक प्रश्न उभे राहतील. पहिल्या चेंडूपासून धावा काढणे हेच आमचे लक्ष्य आहे.’