अफगाणिस्तान(Afghanistan) पूर्णत: तालिबानच्या हाती गेलं आहे. १५ ऑगस्ट २०२१ रोजी तालिबानचे सैनिक काबुल ताब्यात घेत होते. अफगाणिस्तानात सध्या तणावाची परिस्थिती बनली आहे. क्रिकेटपटू राशिद खान आणि मोहम्मद नबी यांच्यासह अनेकांची कुटुंब अफगाणिस्तानात अडकले आहेत आणि त्यांची चिंता खेळाडूंना सतावत आहे. त्यामुळे राशिद व मोहम्मद इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या उर्वरित सामन्यात खेळणार की नाही, याबाबत अनिश्चितता होती. पण, अफगाणिस्तानचे हे दोन स्टार खेळाडू यूएईत होणाऱ्या आयपीएलच्या उर्वरित सामन्यांत खेळणार असल्याची माहिती समोर येत आहे. हे दोघंही सनरायझर्स हैदराबाद संघाचे सदस्य आहेत.
वेस्ट इंडिजच्या पोरांनी पाकिस्तानची वाट लावली; रोमहर्षक लढतीत १ विकेट राखून बाजी मारली!
राशिद व मोहम्मद दोघंही सध्या लंडनमध्ये टी हंड्रेड लीगमध्ये खेळत आहेत. राशिद हा ट्रेंट रॉकेट्स संघाचे, तर नबी लंडन स्पीरिट संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. Insidecricket नं दिलेल्या वृत्तानुसार आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात अफगाणिस्तानच्या खेळाडूंच्या सहभागाविषयी बीसीसीआय प्रयत्नशील आहेत. त्यामुळे आधीच काही सांगणं अवघड आहे. पण, राशिद आणि अन्य अफगाणिस्तानी खेळाडू आयपीएलमध्ये खेळतील, अशी बीसीसीआयला खात्री आहे.
दरम्यान, सनरायझर्स हैदराबादचे CEO के शणनुगम यांनी राशिद व नबी हे दोघंही आयपीएलमध्ये खेळणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, सध्याच्या परिस्थितीबाबत आम्ही अद्याप चर्चा केलेली नाही, परंतु ती दोघंही आयपीएलमध्ये खेळतील. ३१ ऑगस्टला टीम यूएईसाठी रवाना होईल. राशीद व नबी हे पुढील महिन्यात लंडनहून यूएईसाठी रवाना होतील. राशीदनं केलेलं ट्विट व्हायरलकाही दिवसांपूर्वी राशिदने अफगाणिस्तानमध्ये वाढणाऱ्या तालिबान कृत्याला पाहून ट्विटरच्या माध्यमातून जगभरातील नेत्यांना अफगानी लोकांना वाचवण्यासाठी आवाहन केले होते. प्रसिद्ध मिस्ट्री स्पिनर्समध्ये ओळख असलेल्या राशिद खानने ट्विट केले की, जगभरातील प्रिय नेते, आमचा देश संकटात आहे. दरदिवशी महिला आणि मुलांसह हजारो लोक मारले जात आहेत. घरं आणि संपत्तीचं नुकसान होत आहे. लोकं त्यांचं घर सोडून पळण्यासाठी मजबूर आहेत. या कठिण परिस्थितीत आम्हाला एकटं सोडू नका. अफगाणिस्तान आणि येथील लोकांना वाचवा, आम्हाला शांती हवी असं त्याने सांगितले.