भारतीय क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय दौऱ्याला पुढील महिन्यापासून सुरूवात होईल. 2 जूनला भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे आणि त्यानंतर क्वारंटाईन कालावधी पूर्ण करणार आहे. 18 ते 23 जून या कालावधीत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल खेळवली जाईल. त्यानंतर एका महिन्याच्या ब्रेकनंतर टीम इंडिया इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत मैदानावर उतरणार आहे. पण, या मालिकेनंतर बीसीसीआय आयपीएल 2021च्या दुसऱ्या टप्प्याच्या आयोजनाचा विचार करत आहे. बीसीसीआयचे CEO हेमांग आमीन यांनी त्यासाठी दोन पर्याय डोळ्यासमोर ठेऊन वेळापत्रक तयार केले आहेत. सप्टेंबरमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी यूएई व लंडन या दोन पर्यायांचा विचार सुरू आहे आणि 29 मे रोजी होणाऱ्या बैठकीत त्याबाबतचा निर्णय येणे अपेक्षित आहे.
बीसीसीआयचे CEO आमीन यांनी UAEला पहिली पसंती दिली आहे आणि त्यांनी त्यामागची कारणंही समजावून सांगितली आहेत. टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार आमीन यांनी दोन वेळापत्रकं तयार केली आहेत. एक लंडनसाठी आणि एक यूएईसाठी. २९ मे रोजी होणाऱ्या सर्वसाधारण बैठकीत हे वेळापत्रक बीसीसीआयच्या सदस्यांसमोर ठेवण्यात येईल. आमीन यांच्या मते मध्यपूर्व भागात आयपीएलचा दुसरा टप्पा खेळवण्यास काहीच हरकत नाही.
यूएई का?
- येथील हवामान आयपीएल आयोजनसाठी पोषक आहे, लंडनमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात पाऊस पडू शकतो
लंडनच्या तुलनेत यूएईत आयपीएल आयोजन करणं कमी खर्चीक असेल
- २०२०प्रमाणे तीन स्टेडियमवर सामने खेळवण्यासाठी एकच बायो-बबल तयार करणं सोपं जाईल
लंडन का?
- आयपीएलमध्ये नवं काहीतरी घेऊन येण्यासाठी, दक्षिण आफ्रिका व यूएईनंतर आयपीएल तिसऱ्या नव्या देशात खेळवली जाईल
- प्रेक्षकांना स्टेडियमवर परवानगी दिली जाऊ शकते आणि त्यानं फ्रँचायझीचा आर्थिक फायदा शक्य
फ्रँचायझींना आयपीएल २०२१बाबतचा निर्णय लवकर घेण्याची घाई लागली आहे. त्यांना तयारीसाठीही पुरेसा वेळ मिळणार आहे. ''बीसीसीआयला एक पर्याय निवडून त्यादिशेनं काम करावं लागणार आहे. अखेरच्या क्षणापर्यंत निर्णय लांबवून सर्वांना बुचकळ्यात ठेवण्यात काहीच अर्थ नाही. याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल, जेणेकरून त्यासाठीच्या तयारीला पुरेसा वेळ मिळेल,''असे सूत्रांनी सांगितले.
Web Title: IPL 2021 Remaining Matches : UAE vs UK: BCCI CEO suggests 'tried and tested' model for IPL 2021 Phase-2
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.