इंडियन प्रीमिअर लीगच्या ( The 2021 Indian Premier League) 14व्या पर्वातील उर्वरित सामने संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्यात येणार आहेत. 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत पार पडण्यात येणाऱ्या 31 सामन्यांचे वेळापत्रत बीसीसीआयकडून अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. पण, गतविजेता मुंबई इंडियन्स आणि माजी विजेता चेन्नई सुपर किंग्स यांच्यात 19 सप्टेंबरला सामना रंगणार असल्याचे वृत्त समोर आले आहे आणि हा सामना दुबईत खेळवण्यात येणार आहे.
कोरोनाच्या शिरकाव झाल्यामुळे भारतात सुरू असलेली आयपीएल 2021 स्पर्धा स्थगित करावी लागली. त्यानंतर या लीगचे उर्वरित 31 सामने दुबई, अबु धाबी आणि शाहजाह येथे खेळवण्याचा निर्णय झाला. 15 ऑक्टोबरला दुबईत अंतिम सामना होणार आहे, तर 10 ऑक्टोबरला पहिला क्वालिफायर, 11 ऑक्टोबरला एलिमिनेटर आणि 13 ऑक्टोबरला दुसरा क्वालिफायर सामना होणार आहे. आयपीएलचे उर्वरित सामने न झाल्यास बीसीसीआयला 2 हजार कोटींचा फटका बसला असता.
आयपीएल 2021 मध्ये रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सनं 8 पैकी 6 सामने जिंकून 12 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. चेन्नई सुपर किंग्स 7 पैकी 5 सामने जिंकून दुसऱ्या क्रमांकावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू ( 10 गुण), मुंबई इंडियन्स ( 8), राजस्थान रॉयल्स ( 6), पंजाब किंग्स ( 6), कोलकाता नाइट रायडर्स ( 4) व सनरायझर्स हैदराबाद ( 2) हे गुणतालिकेत एकापाठोपाठ आहेत.