IPL 2021 Arjun Tendulkar : इंडियन प्रीमिअर लीगच्या १४ व्या पर्वात २० लाखांच्या मुळ किंमतीत मुंबई इंडियन्सनंअर्जुन तेंडुलकरला ( Arjun Tendulkar) आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. आयपीएल २०२१साठी झालेल्या लिलावात अगदी शेवटचं नाव अर्जुनचं आलं अन् मुंबई इंडियन्स या एकमेव संघानं त्याच्यावर बोली लावली. त्यानंतर सचिन तेंडुलकर, सारा तेंडुलकर या सर्वांनी अर्जुनचं अभिनंदन केलं. आता उत्सुकता होती ती अर्जुनच्या आयपीएल पदार्पणाची. त्यात आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात महान फलंदाज सचिन तेंडुलकर दुबईत दाखल झाला. त्यामुळे सचिन-अर्जुन ही बापलेकाची जोडी सोबत काम करताना दिसेल असे वाटले होते. पण, पदार्पणाची संधी न देताच मुंबई इंडियन्सनं अर्जुनच्या जागी दिल्लीचा गोलंदाज सिमरजीत सिंग याला करारबद्ध केले आहे. मुंबई इंडियन्सनं स्वतः हे अपडेट्स दिले आहेत.
मुंबई इंडियन्सनं मंगळवारी पंजाब किंग्सला पराभूत करून प्ले ऑफचे आव्हान कायम राखले. त्य़ांनी १० गुणांसह सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्यात उर्वरित चार सामन्यांत विजय मिळवून ऐटीत प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याचा त्यांचा मानस आहे. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये नसता प्रयोग करण्याचं धाडस नक्की करणार नाही. त्यामुळे अर्जुनला या पर्वात तरी पदार्पणाची संधी मिळणे अवघड होतेच. त्यात बुधवारी अर्जुन तेंडुलकर जखमी असल्याचे वृत्त समोर आले आणि मुंबई इंडियन्सनं त्याला बदली खेळाडू म्हणून दिल्लीचा गोलंदाज सिमरजीत सिंगची निवड केली. ( Mumbai Indians have added Simarjeet Singh as an injury replacement to Arjun Tendulkar for the remainder of their IPL 2021 season.)
नुकत्याच टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्यावर सिमरजीत भारतीय संघासोबत होता आणि भारताचे ९ खेळाडू कोरोनाच्या विळख्यात सापडल्यानंतर सिमरजीतची भारतीय संघात निवड केली गेली होती. पण त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही.
Web Title: IPL 2021 : Right-arm medium pacer Simarjeet Singh will be replacing Arjun Tendulkar for the remainder of IPL2021
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.