IPL 2021, RR vs PBKS, Live: दुबईत सुरू असलेल्या पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं १८६ धावांचा डोंगर उभारला आहे. सामन्याची नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेल्या पंजाबच्या गोलंदाजांचा राजस्थानच्या सलामीवीरांनी जोरदार समाचार घेत जबरदस्त सुरुवात करुन दिली. राजस्थानचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल यानं आपल्या नजाकती फटक्यांचा नजराणा पेश करत पंजाबच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण केला. तर राजस्थानकडून संधी मिळालेल्या अॅलन लुईसनंही संधीचं सोनं केलं.
यशस्वी जयस्वालनं ३६ चेंडूत ४९ धावांची खेळी साकारली. यात २ खणखणीत षटकार आणि सहा चौकारांचा समावेश आहे. तर लुईसनं २१ चेंडूत ३६ धावांचं योगदान दिलं. दोघांनी सलामीसाठी ५४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसन (४) यावेळी चांगली कामगिरी करू शकला नाही. यष्टीरक्षक केएल राहुलनं सॅमसनचा सुंदर झेल टिपला आणि त्याला माघारी धाडलं. टी-२० प्रकारात सध्या तुफान फॉर्मात असलेल्या लियाम लिव्हिंगस्टोनही १७ चेंडूत २५ धावांचं योगदान दिलं. सामन्याच्या १२ व्या षटकात अर्शदिपच्या गोलंदाजीवर सीमारेषेजवळ पंजाबच्या अॅलन फॅबियननं लिव्हिंगस्टोनचा सुंदर झेल टिपला.
राजस्थानच्या धावसंख्येचा आलेख चढता ठेवण्याचं काम महिपाल लोमरार यानं केलं. अवघ्या १७ चेंडूत ४ खणखणीत षटकार आणि २ चौकारांच्या साथीनं महिपालनं ४३ धावा कुटल्या. अखेरच्या पाच षटकांमध्ये राजस्थानच्या धावसंख्येला लगाम घालण्यात पंजाबला यश आलेलं पाहायला मिळालं. महिपाल बाद झाल्यानंतर राजस्थानचा संपूर्ण संघ मोठे फटके मारण्याच्या नादात बाद झाला. रियान पराग, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, चेतन साकरिया, कार्तिक त्यागी यांना दोन अंकी आकडा देखील गाठता आला नाही.
पंजाबच्या अर्शदिपनं अचूक टप्प्यात मारा करत अखेरच्या षटकांमध्ये कमाल केली. अर्शदिपनं ४ षटकांमध्ये ३२ धावा दिल्या. पण त्यानं राजस्थानच्या ५ खेळाडूंना माघारी धाडलं. आयपीएलमध्ये एका सामन्यात ५ विकेट्स घेण्याची अर्शदिपची ही पहिलीच वेळ ठरली. अनुभवी मोहम्मद शमीनं ४ षटकांमध्ये २१ धावा देत तीन विकेट्स मिळवल्या.