मुंबई : आयपीएल म्हणजे युवा खेळाडूंसाठी हक्काचे व्यासपीठ. येथे कोणता खेळाडू कधी चमकेल याचा काहीच नेम नाही. या स्पर्धेतून केवळ भारतालाच नाही, तर ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, इंग्लंड, द. आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान अशा सर्वच देशांना दमदार खेळाडू मिळाले. अशातंच काही युवा खेळाडूंनी या स्पर्धेत संघांचे नेतृत्त्वही सांभाळले. यंदाही दिल्ली कॅपिटल्ससाठी रिषभ पंत, पंजाब किंग्ससाठी लोकेश राहुल, राजस्थान रॉयल्ससाठी संजू सॅमसन असे युवा कर्णधार आहेत. मात्र, युवा खेळाडूंना कर्णधारपद का बहाल करण्यात याचे कोडे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरला पडले असून त्याने एका मुलाखतीमध्ये हा प्रश्न व्यक्त केला आहे.
आज राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स हे संघ एकमेकांविरुद्ध भिडतील. एकीकडे राजस्थान नव्या कर्णधारासह उतरणार असून पंजाब नव्या नवाने आयपीएलमध्ये श्रीगणेशा करेल. राजस्थानचे नेतृत्त्व युवा संजू सॅमसनच्या खांद्यावर असून पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल याच्याकडेही नेतृत्त्वाच फार मोठा अनुभव नाही. नेमकी हीच बाब धरुन संजय मांजरेकरने "युवा खेळाडूंना कर्णधार म्हणून का नेमलं हे मला अजून कळालेलं नाही", असे म्हटले आहे.
क्रिकइन्फो संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मांजरेकर याने म्हटले की, "युवा खेळाडूंना कर्णधार म्हणून का निवडलं, हे अद्याप मला समजलेले नाही. कदाचित परदेशी खेळाडू कर्णधार म्हणून नको असेल. गेल्याच वर्षी श्रेयस अय्यरला युवा कर्णधार म्हणून आपण पाहिलं आणि आता रिषभ पंतकडे दिल्लीची धुरा सोपवली. लोकेश राहुलकडेही फार मोठा अनुभव नाही, पण तरीही त्याला कर्णधारपद दिले आहे. त्यात संजू सॅमसनला मी कधीही कर्णधार म्हणून पाहिलेले नाही"
मांजरेकरने पुढे म्हटले की, "देशांतर्गत सामन्यात नेतृत्त्व करणे वेगळे असते आणि टीव्हीवर प्रसारण होणाऱ्या एका मोठ्या स्पर्धेत नेतृत्त्व करणे वेगळे असते. त्यामुळे येणारा वेळच सांगेल की या युवा कर्णधारांची कामगिरी कशी होईल. पण एकूणच यामागचे लॉजिक मला कळाले नाही. कारण खूप कमी वयाच्या खेळाडूंना कर्णधार म्हणून निवडले गेले आहे आणि आयपीएलमध्ये नेतृत्त्व करणे अत्यंत अवघड असते. आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून घेतलेल्या निर्णयाचा प्रभाव लगेच दिसून येतो. रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी यांचे उदाहरण आपण घेऊ शकतो. त्यामुळेच युवा खेळाडूंना कर्णधार बनवण्यामागचे लॉजिक मला कळाले नाही"