नवी दिल्ली : कोरोनामुळे स्थगित झालेल्या आयपीएलचा दुसरा टप्पा आता संयुक्त अरब अमिरातीत (युएई) सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. आयपीएलचे या सत्रातील ३१ सामने अजून व्हायचे आहेत. बायोबबलमध्ये असूनही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर यंदा आयपीएल स्थगित करण्यात आली. याची घोषणा बीसीसीआयतर्फे २९ मे नंतर केली जाण्याची शक्यता आहे. त्यावेळी सर्व सदस्य बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण बैठकीसाठी एकत्र येतील.इंग्लंड विरोधातील पाच सामन्यांची कसोटी मालिका ४ ऑगस्ट पासुन सुरू होणार आहे. त्यात दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यातील अंतर कमी केल्यास आयपीएल साठी अतिरिक्त वेळ मिळतो.
काय आहे शक्यताईसीबीने दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीतील ९ दिवसांचे अंतर चार दिवसांवर आणले तर बीसीसीआयला आयोजनासाठी ५ दिवस अतिरिक्त मिळतात.बीसीसीआयकडे १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोंबर या कालावधीत आयपीएलचे आयोजन करण्यासाठी ३० दिवसांचा वेळ आहे. मात्र याच कालावधीत डबल हेडर सामन्यांची संख्या वाढवुन बीसीसीआयला सामने संपवावे लागतील. त्यात चार बाद फेरीचे सामने देखील आहेत.
टी २० विश्वचषकाचे काय ?ईसीबीने जर पाच दिवसांचे अंतर कमी करण्याचे मान्य केले तर बीसीसीआयला मिळालेले पाच दिवस पुढच्या टी२० विश्वचषकाच्या तयारीसाठी मिळु शकतात. कारण १८ ऑक्टोबर पासून टी२० विश्वचषक सुरू होण्याची शक्यता आहे. त्यासाठी देखील सर्वच संघाच्या खेळाडूंना वेळ द्यावा लागेल. तसेही टी २० विश्वचषकाच्या सरावासाठी आयपीएलपेक्षा उत्तम प्लॅटफॉर्म काय असु शकतो, असेही बीसीसीआयच्या सुत्रांनी सांगितले.
जरी बीसीसीआयने या मालिकेचे दिवस कमी करण्याबाबत ईसीबीसोबत चर्चा केली नाही. तरी बीसीसीआयकडे या सामन्यांचे आयोजन करण्यासाठी ३० दिवस आहेत. १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोंबर या कालावधीत आयपीएलचे आयोजन केले जाऊ शकते. जर बीसीसीआय आणि ईसीबीत चर्चा झाली नाही. तर बीसीसीआयला ३० दिवसांतच सर्व ३१ सामन्यांचे आयोजन करावे लागेल. त्यात चार बाद फेरीचे सामने देखील आहेत. त्यात आठ दिवस डबल हेडर सामने घ्यावे लागतील. म्हणजेच या चार अठवड्यांच्या शेवटच्या दोन दिवसांत१६ सामने होतील. तसेच याच काळात मालिका संपल्यावर भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंना युएईत देखीलआणावे लागेल.