- अयाज मेमन
मुंबई : स्वत:ला सिद्ध करायचेय या दडपणाखाली खेळणारे सलामीवीर शिखर धवन (८५ धावा) आणि पृथ्वी शॉ (७२) यांच्या दणादण फटकेबाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलच्या १४ व्या पर्वात शनिवारी ७ गड्यांनी दणक्यात विजयी सलामी दिली. या विजयासह दिल्लीने आपण प्रबळ दावेदार असल्याचा सर्व संघांना इशारादेखील दिला. चेन्नईच्या २० षटकांतील ७ बाद १८८ धावांचे लक्ष्य लीलया गाठताना दिल्लीने १८.४ षटकांत तीन बाद १९० धावा करीत एकतर्फी सामना जिंकला.धवनने ५४ चेंडूंत दहा चौकार आणि दोन षटकारांसह ८५ धावा ठोकल्या. पृथ्वी ३८ चेंडूंत ९ चौकार आणि तीन षटकारांसह ७२ धावा काढून बाद झाला. या दोघांनी १३.३ षटकांत १३८ धावांची सलामी देत सीएसकेच्या तोंडचे पाणी पळविले. धवनने टीम इंडियातील स्थान गमावले होते, तर पृथ्वी राष्ट्रीय संघात परतण्यास धडपडत होता. या खेळींमुळे दोघांच्या आत्मविश्वासात भर पडणार आहे. वानखेडे स्टेडियमवर चेन्नईच्या १८९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी दमदार सुरुवात केली. त्याआधी, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकताच चेन्नईला फलंदाजी दिली. सुरेश रैना याने ३६ चेंडूंत ५४ धावा करीत पुनरागमन यशस्वी केले आहे. सॅम कुरेनने अखेरच्या टप्प्यात चार चौकार आणि दोन षटकारांसह १५ चेंडूंत ३४ धावा करीत ७ बाद १८८ पर्यंत मजल गाठून दिली. चेन्नईने अखेरच्या पाच षटकांत ५२ धावा काढल्या. रायुडूने १६ चेंडूंत २३ धावांची भर घातली. कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या अपयशाची मालिका आजही कायम राहिली. तो खेळपट्टीवर येताच त्रिफळाबाद होऊन परतला. चेन्नईची सुरुवात मात्र खराब झाली. सात धावांत त्यांचे दोन्ही सलामीवीर ऋतुराज गायकवाड (५) आणि फाफ डुप्लेसिस (०) माघारी परतले होते. सॅम कुरेनने अखेरच्या काही षटकांत ३४ धावा काढल्या. जडेजाने २६ धावांवर नाबाद राहून फिट असल्याचे दाखवून दिले....................................................
दिल्लीकडून ख्रिस व्होक्स आणि आवेश खान यांनी प्रत्येकी दोन, तसेच रविचंद्रन अश्विन आणि टॉम कुरेन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.दिल्लीने शिमरोन हेटमायर, मार्कस् स्टोयनिस, ख्रिस व्होक्स आणि टॉम कुरेन या चार, तर चेन्नईने डुप्लेसिस, मोईन अली, सॅम कुरेन आणि ड्वेन ब्राव्हो यांना सामन्यात संधी दिली.
- धोनीचा चौथा भोपळा : रॉयल्स २०१० एक चेंडू, डेअरडेव्हिल्स २०१० दोन चेंडू, मुंबई २०१५ एक चेंडू, कॅपिटल्स २०२१ दोन चेंडू.- चेन्नईविरुद्ध सर्वोच्च भागीदारी : रहाणे- वाटसन १४४ धावा, २०१५ अहमदाबाद. पृथ्वी शॉ- धवन १३८ धावा २०२१ मुंबई. बिस्ला- कॅलिस १३६ धावा, चेन्नई २०१२.- सीएसकेविरुद्ध सर्वाधिक धावा : शिखर धवन ९१०, विराट कोहली ९०१, रोहित शर्मा ७४९, डेव्हिड वॉर्नर ६१७, एबी डिव्हिलियर्स ५९३, रॉबिन उथप्पा ५९०.