दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज श्रेयस अय्यर यानं संघाच्या कर्णधारपदाबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. IPL सामन्यांमध्ये दिल्लीच्या संघाचं नेतृत्व करणं आपल्याला पसंत आहे. परंतु ऋषभ पंत याला संघाचं नेतृत्व करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा आपण सन्मान करतो असं तो म्हणाला. अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघानं आयपीएल २०२० मध्ये फायनलमध्ये स्थान मिळवलं होतं. दरम्यान, श्रेयर अय्यरच्या खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात सहभागी होता आलं नव्हतं. यानंतर संघ व्यवस्थापनानं पंतकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली होती.
कोरोना महासाथीच्या कारणास्तव मे महिन्यात होणाऱ्या आय़पीएल सामन्यांचं आयोजन पुढे ढकलण्यात आलं होतं. परंतु सामने सुरू झाल्यानंतर श्रेयस अय्यरनं दमदार पुनरागमन केलं. परंतु आता पंतलाच दिल्लीच्या संघानं कर्णधारपदी कायम ठेवलं आहे. हा संघ व्यवस्थापनाच्या धोरणाचा एक भाग आहे आणि याची कोणतीही तक्रार नाही असं तो म्हणाला. "जेव्हा मला कर्णधारपद देण्यात आलं होतं तेव्हा मी निराळ्या मानसिक स्थितीत होतो आणि निर्णय घेण्याची क्षमता आणि सहनशीलता चांगली होती. गेल्या दोन वर्षांत मला याचा फायदा झाला," असं अय्यर दिल्लीच्या सामन्यानंतर म्हणाला.
"हा संघ व्यवस्थापनाचा निर्णय आहे आणि त्यांनी जो निर्णय घेतला आहे त्याचा आपण आदर करतो. या सत्राच्या सुरूवातीपासूनच पंत संघाचं नेतृत्व करत आहे आणि त्यानं हा सीजन संपेपर्यंत कर्णधारपदी राहिलं पाहिजे, या निर्णयाचा आपण आदर करतो," असंही तो म्हणाला.