IPL 2021: आयपीएलच्या रणधुमाळीला ९ एप्रिलपासून सुरुवात होतेय. यासाठी प्रत्येक संघ जोरदार तयारीला लागलाय. त्यात आज दक्षिण आफ्रिकेचे तडाखेबाज फलंदाज एबी डीव्हिलियर्स चेन्नईत दाखल झाला असून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या ताफ्यात दाखल झाला आहे. कोरोनाच्या नियमांमुळे खेळाडूंना 'बायो बबल'मध्ये राहावं लागणार आहे.
'मिस्टर ३६०' म्हणून ओळखला जाणारा डिव्हिलियर्स चेन्नईत दाखल होताच बंगळुरू संघानं धमाल ट्विट केलंय. "इंटरनेटवर धुमाकूळ. चेन्नईत लँड झालं स्पेसशिप. एबी डीव्हिलियर्स चेन्नईत बंगळुरू संघाच्या 'बायो बबल'मध्ये दाखल झाला", असं ट्विट रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं केलं आहे.
'आरसीबी'साठी डीव्हिलियर्स अतिशय महत्वाचा खेळाडू आहे. जोरदार फटकेबाजी आणि संपूर्ण मैदानाच्या कोणत्याही दिशेला फटकेबाजी करण्यासाची ताकद डीव्हिलियर्समध्ये आहे. डीव्हिलियर्स आता आयपीएलमध्ये धमाल करण्यासाठी सज्ज झाला असल्याचं एक प्रकारे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं सांगितलं आहे.
कर्णधार कोहली देखील पोहोचला
एबी डीव्हिलियर्ससोबतच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहली देखील चेन्नईत पोहोचला आहे. आरसीबीच्या संघात मातब्बर खेळाडूंचा भरणा असतानाही आजवर एकदाही संघाला विजेतेपद प्राप्त करता आलेलं नाही. गेल्या मोसमात आरसीबीनं चांगली कामगिरी केली पण विजेतेपदापर्यंत पोहोचता आलं नाही. यावेळी कर्णधार कोहलीनं आयपीएल सुरू होण्याआधीच आरसीबीसाठी सलामीला फलंदाजीसाठी उतरणार असल्याचं जाहीर करुन आक्रमक रुपानं स्पर्धेला सामोरं जाणार असल्याचं दाखवून दिलं आहे. त्यामुळे या मोसमात आरसीबी कशी कामगिरी करतंय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
Web Title: IPL 2021 Spaceship lands in Chennai RCB tweet goes viral about ab de villiers
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.