IPL 2021, Sunrisers Hyderabad vs Chennai Super Kings Live Updates : चेन्नई सुपर किंग्स ( CSK)नं आयपीएल २०२१च्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याचा पहिला मान पटकावला. सनरायझर्स हैदराबाद ( SRH) विरुद्धच्या सामन्यात चेन्नईनं सांघिक कामगिरी करताना सहज विजय मिळवला. या पराभवामुळे हैदराबादही अधिकृतपणे प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद झाले आहेत. CSKच्या खात्यात ११ सामन्यांत १८, तर SRHच्या खात्यात ११ सामन्यांत ४ गुण जमा झाले आहेत. आता हैदराबादनं उर्वरित तिन्ही सामने जिंकले, तरी ते प्ले ऑफमध्ये प्रवेश करू शकत नाही. चेन्नईला विजयासाठी अखेरच्या षटकापर्यंत संघर्ष करावा लागला.
चेन्नई सुपर किंग्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावून सेंटर ऑफ अट्रॅक्शन ठरेलला जेसन रॉय ( २) आज अपयशी ठरला. केन विलियम्सन व वृद्धीमान सहा यांनी चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला, परंतु ब्राव्होनं त्याच्या पहिल्याच षटकात विलियम्सनला ( ११) पायचीत पकडले. ब्राव्होनं आणखी एक विकेट घेत प्रियाम गर्गला ( ७) बाद केले. सहा एकटा खंबीरपणे उभा होता, परंतु रवींद्र जडेजाच्या फिरकीवर तोही बाद झाला. सहानं १ चौकार व २ षटकार खेचून ४४ धावा केल्या. जोश हेझलवूडनं एकाच षटकात दोन धक्के देत CSKची बाजू भक्कम केली. त्यामुळे SRH ची गाडी घसरली. त्यांना जेमतेम ७ बाद १३४ धावांवर समाधान मानावे लागले.
माफक लक्ष्याच्या प्रत्युत्तरात CSKच्या फॅफ ड्यू प्लेसिस व ऋतुराज गायकवाड यांनी पॉवरफुल्ल खेळ केला. २०२१त सहाव्यांदा अर्धशतकी भागीदारी करताना संघाच्या विजयाचा मजबूत पाया रचला. राशिद खानच्या जादूई फिरकीलाही त्यांनी सडेतोड उत्तर दिले. ऋतुराजनं सातत्यपूर्ण कामगिरी करताना अर्धशतकाच्या दिशेनं वाटचाल केली होती, परंतु ११व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जेसन होल्डरनं त्याला बाद केलं. ऋतुराजनं पुढे येऊन चेंडू टोलावला आणि केन विलियम्सननं मिड ऑफला सहज झेल टिपला. ऋतुराजनं ३८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकार खेचून ४५ धावा केल्या.