IPL 2021, SRH vs MI Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वात ( IPL 2022) दोन नवीन संघ दाखल होणार असल्यामुळे पुन्हा एकदा लिलाव होणार आहे. त्यामुळे सर्वच संघांमध्ये बदल पाहायला मिळतील. बीसीसीआयनं अजूनही त्यांच्या रिटेशन नियमांची घोषणा केलेली नाही. त्यामुळे सध्या खेळत असलेल्या ८ फ्रँचायझींमधील कोणते खेळाडू कायम राहतील याची गॅरंटी नाही. त्यात आजच्या साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं ( SRH) डेव्हिड वॉर्नरला ( David Warner) बाकावर बसवले. ज्या खेळाडूनं SRHला एकमेव आयपीएल जेतेपद जिंकून दिलं, त्याच्यावर प्रेक्षकांमध्ये बसून संघाचा झेंडा हलवत राहण्याची पाळी आली. आजच्या सामन्यात तरी त्याला संधी द्यायला हवी होती, असे चाहत्यांना वाटत होते. पण, आजही संधी न मिळाल्यानं वॉर्नरनं इंस्टाग्रावर भावनिक पोस्ट लिहिली. David Warner says his goodbyes to the #SRH fans
सनरायझर्स हैदराबाद संघाला आजच्या सामन्यात पुन्हा एकदा नवा कर्णधार मिळाला आहे. डेव्हिड वॉर्नर आणि केन विल्यमसन यांच्यानंतर आता हैदराबादच्या संघ व्यवस्थापनानं मनिष पांडेला कर्णधार पदाची धुरा दिली आहे. आजच्या सामन्यात मनिष पांडे सनरायझर्स हैदराबाद संघाचं नेतृत्त्व करत आहे. सनरायझर्स हैदराबादसाठी आजचा सामना केवळ औपचारिकता म्हणून राहिला आहे. कारण संघ केवळ ३ विजयांसह गुणतालिकेत तळाशी आहे. त्यामुळे संघाचं आव्हान याआधीच संपुष्टात आलेलं आहे.
डेव्हिड वॉर्नरला या पर्वात ८ सामन्यांत १९५ धावा करता आल्या आहेत. आयपीएल २०२१च्या पहिल्या टप्प्यातील काही सामन्यांनंतर त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेताना केन विलियम्सनकडे जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर वॉर्नरला आता दुसऱ्या टप्प्यात थेट संघाबाहेरच बसवले गेले. त्यामुळे SRH सोबतचा वॉर्नरची ही शेवटची आयपीएल स्पर्धा असल्याची चर्चा सुरूच आहे. आता SRH लिलावापूर्वी कोणत्या खेळाडूंना रिटेन करते, त्यानंतर यावरील पडदा उठेल. २०१६मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली SRHनं जेतेपद पटकावले होते. त्यानं आयपीएलमध्ये १५० सामन्यांत ५४४९ धावा केल्या आहेत. दरम्यान, वॉर्नरनं आज इंस्टाग्राम पोस्टवरून आयपीएल २०२१चा निरोप घेतला.
तो म्हणाला, अविस्मरणीय आठवणी दिल्याबद्दल सर्वांचे आभार. आमच्या संघाच्या सतत मागे उभे राहुन प्रोत्साहन देणाऱ्या चाहत्यांचे आभार. तुम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी माझे आभाराचे दोन शब्दही कमी पडतील. हा सुखमयी प्रवास होता. मी आणि माझे कुटुंबीय तुम्हा सर्वांना मिस करू.
Web Title: IPL 2021, SRH vs MI Live Updates : David warner took Instagram to says goodbyes to the SRH fans, Is this a final farewell from David Warner to SRH?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.