IPL 2021, Sunrisers Hyderabad vs Punjab Kings Live Updates : पंजाब किंग्सच्या मॅनेजमेंटला आजच्या सामन्यातून एक धडा शिकायला मिळाला. ज्य रवी बिश्नोईला त्यांनी बाहेर बसवण्याचा निर्णय घेतला होता त्यानेच आज अटीतटीच्या सामन्यात त्यांना मदत केली. पण, सनरायझर्स हैदराबादच्या ( SRH) जेसन होल्डरनं ( Jason Holder) अष्टपैलू कामगिरी करून पंजाब किंग्सच्या ताफ्यात चिंतेचे वातावरण कायम ठेवले होते. अर्षदीप सिंगनं शेवटच्या टप्प्यात फेकलेला स्पेल अप्रतिम होता. त्यात ऑस्ट्रेलियाचा डेथ ओव्हर स्पेशालिस्ट नॅथन एलिसनं पदार्पणाच्या सामन्यात भन्नाट २०वे षटक फेकले. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात पंजाब किंग्सनं ६ धावांनी विजय मिळवत प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या. पण, हैदराबाद IPL 2021च्या प्ले ऑफ शर्यतीतून बाद होणारा पहिला संघ ठरला. ( #SRH becomes the first team to be out of the play-offs hopes in #IPL2021.)
पंजाब किंग्सच्या ( PBKS) फलंदाजांनी सनरायझर्स हैदराबादच्या ( SRH) गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली. जेसन होल्डरनं तीन महत्त्वाच्या विकेट्स घेत पंजाबला २० षटकांत ७ बाद १२५ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. सनरायझर्स हैदराबादच्या क्षेत्ररक्षकांनीही अफलातून झेल टिपले. लोकेश राहुल व मयांक अग्रवाल पुन्हा एकदा पंजाबला स्फोटक सुरुवात करून देतील अशी अपेक्षा होती. मात्र, जेसन होल्डरनं दोघांनाही माघारी पाठवलं. पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर लोकेश ( २१) बाद झाला, तर पाचव्या चेंडूवर मयांक ( ५) माघारी परतला. ख्रिस गेलकडून मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु तोही राशिद खानच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला अन् १४ धावांवर तंबूत परतला. निकोलस पूरनचा ( ८) अपयशाचा पाढा कायम राहिला अन् अब्दुल समदनं त्याची विकेट घेतली.
एडन मार्कराम ( २७) याला संदीप शर्मानं स्वतःच्याच गोलंदाजीवर अफलातून झेल घेत माघारी पाठवून पंजाबची अवस्था ५ बाद ८८ अशी केली. १६व्या षटकात कर्णधार केन विलियम्सननं पुन्हा होल्डरला पाचारण केलं अन् त्यानं दीपक हुडाची विकेट मिळवून दिली. बदली खेळाडू जे सुचिथनं अफलातून झेल टिपला. त्यानंतर पंजाब किंग्सला डोकं वर काढणं अवघड गेलं अन् त्यांनी कशाबशा ७ बाद १२५ धावा करता आल्या. होल्डरनं १९ धावांत ३ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात हैदराबादलाही सुरुवातीला धक्के बसले. डेव्हिड वॉर्नर ( २) आणि केन विलियम्सन ( १) हे अपयशी ठरले. वॉर्नरचे अपयश या संपूर्ण पर्वात संघासाठी मारक ठरले आहे. मनीष पांडे ( १३) हाही माघारी परतल्यानं हैदराबादची अवस्था २ बाद ३२ अशी झाली. त्यांनी पॉवर प्लेमध्ये २ बाद २० धावा केल्या आणि आयपीएल इतिहासातील त्यांची ही पॉवर प्लेमधील सर्वात खराब कामगिरी ठरली ( SRH 20/2 after Powerplay. Their lowest ever total in the history of the IPL)
१३व्या षटकात दोन धक्के अन् पंजाबचे कमबॅक, पण...
रवी बिश्नोईच्या चेंडूवर कट शॉट मारण्याच्या प्रयत्नात केदार ( १२) त्रिफळाचीत झाला. त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर बिश्नोईनं अब्दुल समदला बाद केलं. या दोन विकेट्सनं सामन्याला कलाटणी मिळाली. हैदराबादचा निम्मा संघ ६० धावांत माघारी परतला अन् त्यांना अखेरच्या सहा षटकांत विजयासाठी ६२ धावा करायच्या होत्या. बिश्नोईनं २४ धावांत ३ विकेट्स घेऊन त्याचं महत्त्व पंजाब किंग्सच्या मॅनेजमेंटला समजावून सांगितले. पण, त्याच्या मेहनतीवर जेसन होल्डरनं पाणी फिरवले.
१७व्या षटकात होल्डर व सहा यांचा ताळमेळ चुकला अन् विकेट टिकवून खेळणाऱ्या सहाला ( ३१) धावबाद होऊन माघारी जावं लागलं. अर्षदीप सिंगनं त्या षटकात फक्त ५ धावा देत हैदराबादवरील दडपण वाढवले. शमीनं टाकलेल्या १८व्या षटकात ९ धावा आल्या. त्यामुळे अखेरच्या १२ चेंडूंत हैदराबादला २१ धावा करायच्या होत्या. १९व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अर्षदीपनं SRHच्या राशिद खानची ( ३) विकेट घेत सामन्यातील रंजकता अधिक वाढवली. त्या षटकातही त्यानं फक्त ४ धावा देत एक विकेट घेतली. आता SRH ला ६ चेंडूंत १७ धावा करायच्या होत्या. हैदराबादला ७ बाद १२० धावाच करता आल्या. होल्डर २९ चेंडूंत ५ चौकारांसह ४७ धावांवर नाबाद राहिला.
Web Title: IPL 2021, SRH vs PBKS Live Updates : PBKS has defended 126 runs against SRH, credit goes to bowling lead by Bishnoi, Shami, Arshdeep
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.