इंडियन प्रीमिअर लीगचे १४व्या पर्व स्थगित करण्याचा निर्णय मंगळवारी बीसीसीआयनं घेतला. मागील दोन दिवसांपासून काही खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यात मंगळवारी SRH व DC संघातील अनुक्रमे वृद्घीमान सहा व अमित मिश्रा यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला अन् बीसीसीआयला अखेर स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागला. बीसीसीआयनं मध्यांतराला स्पर्धा स्थगित केल्यामुळे बीसीसीआयला जवळपास दोन ते अडीच हजार कोटींचे नुकसान सहन करावे लागणार आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं दिली. आता या नुकसानाचा खेळाडूंच्या पगारावरही परिणाम होणार आहे.
आता स्पर्धेचे २९ सामने झालेत आणि ३० सामने शिल्लक असताना ही स्पर्धा स्थगित केली गेली आहे. त्यामुळे आता खेळाडूंना निम्मे वेतन मिळणार आहे. समजा जर एखाद्या खेळाडूची लिलाव किंमत १४ कोटी असेल आणि त्यानं सात सामनेच खेळले असतील, तर त्याला केवळ सात कोटीच मिळतील. पण, खेळाडूनं स्वतःहून माघार घेतल्यास हा नियम लागू होईल, पण आता बीसीसीआयनेच स्पर्धा स्थगित केल्यानं त्या हिशोबानं खेळाडूंना पगार द्यावा लागेल. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितले की, ''हे सत्र मध्येच स्थगित केल्यामुळे आम्हाला २००० ते २५००० कोटींचे नुकसान होऊ शकतो. माझ्या माहितीनुसार २२०० कोटींचं नुकसान निश्चित आहे.''
स्टार स्पोर्ट्ससोबत पाच वर्षांसाठी १६, ३४७ कोटींचा करार केला गेला आहे. त्यानुसार प्रतीवर्ष ३ हजार २६९ कोटी अशी किंमत होते. जर ६० सामने होतात, तर प्रत्येक सामन्याची राशी ही जवळपास ५४ कोटी ५० लाख इतकी होते. आता २९ सामन्यांनुसार १५८० कोटी इतकी किंमत होते. अशात बोर्डाला १६९० कोटींचा नुकसान होणार आहे.