चेन्नई : सनरायजर्स हैदराबादविरुद्ध शानदार कामगिरी करणाऱ्या दोन वेळच्या चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाला आयपीएलच्या लढतीत मंगळवारी परंपरागत प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. केकेआर संघ विजयी लय कायम राखण्यास प्रयत्नशील असेल. गेल्या दोन मोसमात प्लेऑफमध्ये स्थान मिळविण्यात अपयशी ठरलेल्या केकेआर संघाने रविवारी पहिल्या लढतीत सनरायजर्स हैदराबादचा १० धावांनी पराभव केला.
आघाडीच्या फळीतील आक्रमक फलंदाजीनंतर दिनेश कार्तिकने ९ चेंडूंमध्ये २२ धावांच्या मदतीने केकेआरची आक्रमकता कायम राखली. कर्णधार इयोन मॉर्गनने नाणेफेकीच्या वेळीच विश्वासपात्र सुनील नारायणला वगळत आक्रमक खेळाचे संकेत दिले होते. नितीश राणा व शुभमन गिल यांनी पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळ करीत आपला निर्धार जाहीर केला होता.
कमजोर बाजूकेकेआर : कर्णधार इयोन मॉर्गन व गिल यांना सूर गवसणे आवश्यक. मुंबई : सूर्यकुमार यादवकडून मोठी खेळी अपेक्षित. सहाव्या गोलंदाजाची उणीव.
मजबूत बाजूकेकेआर : आक्रमक सलामी जोडीसह मधल्या फळीत रसेल, मॉर्गन व कार्तिकसारख्या आक्रमक फलंदाजांचा समावेश. शाकिब - अल - हसनच्या समावेशामुळे मधली फळी अधिक मजबूत झाली आहे.मुंबई इंडियन्स : रोहित शर्माचे कल्पक नेतृत्व. ख्रिस लिनचा शानदार फॉर्म. जसप्रीत बुमराह व ट्रेंट बोल्ट यांच्यासारख्या वेगवान गोलंदाजांचा समावेश.