मुंबई : लोकेश राहुलच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्स व संजू सॅम्सनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स संघांदरम्यान सोमवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळल्या जाणाऱ्या लढतीत उभय संघातील ‘बिग हिटर’वर नजर राहील. राजस्थान संघाची भिस्त अष्टपैलू बेन स्टोक्सवर अवलंबून राहील. स्टोक्स सूर गवसण्यासाठी प्रयत्नशील राहील तर इंग्लंडचा जोस बटलर व नवनियुक्त कर्णधार सॅम्सनही चांगली सुरुवात करण्यास उत्सुक असतील. पंजाब संघाची फलंदाजी बाजू वानखेडेच्या फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर कुठल्याही प्रतिस्पर्धी संघासाठी धोकादायक ठरू शकते. रॉयल्स संघात अष्टपैलू शिवम दुबे, श्रेयस गोपाल, राहुल तेवतिया, रियान पराग व लियाम लिविंगस्टोन यांच्या रुपाने चांगले पर्याय उपलब्ध आहेत. गोपाल, तेवतिया व पराग लेग स्पिन गोलंदाजीही करू शकतात. अशा स्थितीत रॉयल्स संघ दोन लेग स्पिनरसह खेळतो किंवा नाही, याबाबत उत्सुकता असेल.
कमजोर बाजूपंजाब किंग्स : संघाचे योग्य संयोजन साधणे आवश्यक. राजस्थान रॉयल्स : बेन स्टोक्सला सूर गवसणे आवश्यक. विदेशी खेळाडूंना भारतीय खेळाडूंची साथ मिळणे गरजेचेच.
मजबूत बाजूपंजाब किंग्स : राहुल, ख्रिस गेल, मयांक अग्रवाल यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश. गोलंदाजीची भिस्त वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर अवलंबून. राजस्थान रॉयल्स : अष्टपैलू बेन स्टोक्स, जोस बटलर व संजू सॅम्सन यांच्या समावेशामुळे फलंदाजी मजबूत. ख्रिस मॉरिसकडून संघाला गोलंदाजीमध्ये तसेच फलंदाजीमध्येही शानदार कामगिरीची आशा.