चेन्नई : सनरायजर्स हैदराबाद संघाला शनिवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सच्या बलाढ्य संघाविरुद्ध योग्य संयोजनासह उतरावे लागेल. सनराजयर्स संघ सलग दोन पराभवानंतर विजय नोंदवत गुणांचे खाते उघडण्यासाठी प्रयत्नशील आहे. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील सनरायजर्स संघासाठी चेन्नईची खेळपट्टी ‘अनलकी’ ठरली आणि संघ १५० पेक्षा कमी धावांचे लक्ष्य गाठण्यातही अपयशी ठरला. पहिल्या दोन सामन्यात संघाला लक्ष्याचा पाठलाग करण्यात अडचण आली. त्यामुळे अंतिम ११ खेळाडूंमध्ये पर्यायी भारतीय खेळाडू नसल्याची उणीव चव्हाट्यावर आली.डग आऊटमध्ये केदार जाधवसारखा अनभवी खेळाडू व प्रियम गर्ग व अभिषेक शर्माच्या रूपाने दोन प्रतिभावान खेळाडूंच्या उपस्थितीत साहाला या कामगिरीमुळे संघात फार जास्त संधी मिळण्याची आशा कमी आहे. केदार व अभिषेकसह संघ जर उतरत असेल तर फिरकी गोलंदाजीमध्ये पर्याय उपलब्ध होईल. विदेशी खेळाडूंमध्ये केवळ वॉर्नर व राशिद खान यांची निवड निश्चित आहे. अशा स्थितीत सनरायजर्सला पूर्णपणे फिट केन विलियम्सनची गरज आहे. कारण फिरकी गोलंदाजीविरुद्ध तो चांगला फलंदाज आहे.रोहित शर्मा, क्विंटन डिकॉक, सूर्यकुमार यादव व ईशान किशन यांच्यासारख्या मुंबई इंडियन्सच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांचा विचार करता संदीप शर्मा व सिद्धार्थ कौल यांच्यासारखे हैदराबाद संघातील पर्यायी वेगवान गोलंदाज अधिक प्रभावी भासतात.कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध चुरशीच्या लढतीत विजय मिळविणारा मुंबई इंडियन्स संघ अंतिम ११ खेळाडूंत बदल करण्याची शक्यता कमी आहे. मुंबई इंडियन्स मात्र आपल्या फलंदाजांकडून चमकदार कामगिरीची आशा आहे. त्यांना अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
- कर्णधार वॉर्नरच्या संघनिवडीबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. जॉनी बेयरस्टॉ व रिद्धिमान साहाच्या रूपाने दोन यष्टिरक्षकांना अंतिम अकरा खेळाडूंमध्ये स्थान देण्यात येत असल्यामुळे कुठला उद्देश पूर्ण होत नाही. साहा सलामीवीर म्हणून फॉर्मात नसल्याचे दिसत आहे. साहा २००८ मध्ये पहिल्या स्पर्धेपासून आयपीएलचा भाग आहे; पण आकडेवारी बघता त्याला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही.