इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वात पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सला अजूनही साजेशी कामगिरी करता आलेली नाही. पाचपैकी तीन सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला. शुक्रवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सनं MIवर ९ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. आतापर्यंत झालेल्या पाच सामन्यांत MI ला १६० धावांचा आकडाही पार करता आलेला नाही. क्विंटन डी कॉक, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि इशान किशन या आघाडीच्या चार फलंदाजांकडून फार अपेक्षा आहेत. पण, त्याचवेळी हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या व किरॉन पोलार्ड यांना साजेशी कामगिरी करता आलेली नाही. हार्दिक तर गोलंदाजीही करत नाही आणि त्यामुळे संघाचे ताळमेळही चुकताना पाहायला मिळत आहे.
कृणालनं पाच सामन्यांत ७.२५च्या सरासरीनं फक्त २९ धावा केल्या आहेत आमि केवळ तीन विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं १६ षटकांत प्रतिस्पर्धींना ११६ धावा दिल्या आहेत. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात कृणाल पांड्या उगाच भडकलेला पाहायला मिळाला आणि त्यानंतर नेटिझन्सनी त्याची शाळाच घेतली.