इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वातील पहिला सुपर ओव्हर सामना रविवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झाला. दिल्ली कॅपिटल्सनं हा सामना जिंकून आयपीएलच्या सलग तीन पर्वात सुपर ओव्हर सामने जिंकण्याची मालिका कायम राखली, तर सनरायझर्स हैदराबादनं सुपर ओव्हरमधील सलग तिसरा सामना गमावला. या सामन्यानंतर भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) यानं SRHवर टीका केली.दिल्लीनं ४ बाद १५९ धावा केल्या होत्या आणि प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादला ७ बाद १५९ धावा करता आल्या.
सुपर ओव्हरचा थरार
- केन विलियम्सन व डेव्हिड वॉर्नर हैदराबादकडून मैदानावर उतरले. अक्षर पटेलनं दिल्लीसाठी ते षटक फेकले. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक धाव आली अन् केननं दुसरा चेंडू चौकार खेचला. हैदराबादला त्या षटकात ८ धावा करता आल्या. पण, वॉर्नरनं एक धाव शॉर्ट धावल्यानं SRHला ७ धावांवर समाधान मानावे लागले.
- राशिद खानला गोलंदाजीला आणल्याचं पाहताच दिल्लीनं रिषभ पंत व शिखर धवन ही डावखुरी जोडी मैदानावर उतरवली. रिषभ पंतनं पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली. दुसऱ्या चेंडूवर एक धाव आल्यानंतर रिषभनं तिसऱ्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारून चौकार खेचला. राशिदनं पुढील दोन चेंडू निर्धाव फेकली अन् पाचव्या चेंडूवर रिषभसाठी LBWची अपील झाली. पण, SRHचा DRS वाया गेला. अखेरच्या चेंडूवर एक धाव घेत दिल्लीनं विजय पक्का केला.
वीरू काय म्हणाला?एकतर जॉनी बेअरस्टो टॉयलेटमध्ये असेल, नाहीतर सुपर ओव्हरमध्ये त्याला न पाठवण्यामागचं कारणच नव्हतं. त्यानं सामन्यात १८ चेंडूंत ३८ धावा चोपल्या होत्या आणि सुपर ओव्हरमध्ये क्लिन हिटरची गरज होती. हैदराबादनं चांगली लढत दिली, परंतु अचंबित करण्याच्य निर्णयाचा त्यांना फटका बसला आणि त्यासाठी त्यांनी स्वतःलाच जबाबदार धरायला हवं,'' असे वीरूनं ट्विट केलं.