इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2021) मंगळवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ( Mumbai Indians Vs Kolkata Knight Riders) यांच्यातला सामना कट्टर झाला. MIनं हा सामना KKRच्या जबड्यातून खेचून आणताना १० धावांनी जिंकला. हा सामना कोलकाता सहज जिंकेल, असेच सर्वांना वाटत होते. पण, रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) कल्पक नेतृत्वासमोर KKRने गुडघे टेकले. या सामन्यातील एक फोटो तुफान व्हायरल झाला होता. त्यात रोहितची पत्नी रितिका ( Ritika Sajdeh), हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टँनकोव्हिच ( Natas Stankovic) आणि कृणाल पांड्याची पत्नी पंखुडी शर्मा हे आश्चर्यचकीत झालेले पाहायला मिळाले. नताशा तिच्या मोबाईलमध्ये या दोघींना काहीतरी दाखवत होती आणि त्यानंतर या तिघींनी अशी रिअॅक्शन दिली.
रितिका व नताशा हे नक्की कशामुळे हैराण झाल्या हे कुणालाच कळले नाही, परंतु मुंबई इंडियन्सनं सोशल मीडियावर हा फोटो पोस्ट करून त्यामागचं कारण सांगितलं. मुंबई इंडियन्सनं या घटनेशी संबंधित दोन फोटो पोस्ट केली. एकात या तिघींचा फोटो दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोत त्यामागचं कारण सांगितलं आहे. दुसऱ्या फोटोत रोहित शर्मा गोलंदाजी करताना दिसत आहे. रोहितला गोलंदाजी करताना रितिकाला आश्चर्याचा धक्का बसल्याचे, MIने सांगितले आहे.
मुंबई इंडियन्सच्या १५२ धावांचा पाठलाग करताना KKRला अखेरच्या सहा षटकांत विजयासाठी ४० धावा हव्या होत्या. पण, १५व्या षटकात राहुल चहरनं ९ धावा देताना MIला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. त्यानं त्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर सेट फलंदाज नितीश राणाला ( ५७) बाद केले. क्रीज सोडून पुढे गेलेल्या नितीशला बाद करण्याची आयती संधी यष्टिरक्षक क्विंटन डी कॉकनं गमावली नाही.
१६व्या षटकात कृणाल पांड्यानं दुसऱ्याच चेंडूवर KKRच्या शाकिब अल हसनला ( ९) बाद करून मोठा धक्का दिला. पण, पुढच्याच चेंडूवर कृणालनं KKRचा स्फोटक फलंदाज आंद्रे रसेल याचा झेल सोडला. हा सामन्याला कलाटणी देणारा क्षण ठरेल असेच वाटले होते. जीवदान मिळाल्यानंतर रसेल थोडा सावध खेळला. त्या षटकात KKRला एकच धाव मिळाली. १७व्या षटकात जसप्रीत बुमराहनं ८ धावा दिल्या. त्यातील चार धावा या फ्री हिटवर आल्या. त्यामुळे अखेरच्या तीन षटकांत २२ धावा KKRला करायच्या होत्या. यात रोहित शर्मानंही आक्रमक क्षेत्ररक्षण लावताना KKRच्या फलंदाजांवर दडपण निर्माण केलं.
१८व्या षटकात कृणालच्या गोलंदाजीवर रसेलला ( ५ धावांवर) जसप्रीतनं जीवदानं दिलं. आता रसेल घाबरत घाबरतचं खेळला. बॅट आणि चेंडू यांचा ताळमेळ त्याला राखता आलाच नाही. त्या षटकात तीनच धावा त्यांना करता आल्या. १९व्या षटकात बुमराहनं ४ धावा दिल्या आणि अखेरच्या षटकात KKRला १५ धावांची गरज होती. ट्रेंट बोल्टच्या अखेरच्या षटकांत पहिल्या दोन चेंडूंत दोन धावा आल्या. तिसऱ्या चेंडूवर बोल्टनं रसेलला बाद केलं. पुढच्याच चेंडूवर त्यानं पॅट कमिन्सचा त्रिफळा उडवला. कोलकाताला ७ बाद १४२ धावाच करता आल्या. मुंबईनं १० धावांनी हा सामना जिंकला.