मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या यंदाच्या आयपीएलमधील उर्वरित ३१ सामने यूएईमध्ये आयोजित करण्याचे जाहीर केले. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत होणाऱ्या सामन्यांना १९ किंवा २० सप्टेंबरपासून सुरुवात होईल. त्याचवेळी, आता या उर्वरित सामन्यांत सुमारे ४० विदेशी खेळाडूंचा सहभाग दिसणार नसल्याची माहिती मिळत आहे.आयपीएलच्या उर्वरित सामन्यांच्या आयोजनादरम्यान अनेक देशांच्या आंतरराष्ट्रीय मालिका रंगणार असल्याने विदेशी खेळाडूंच्या सहभागावर शंका निर्माण होत आहे. त्यामुळेच जर असे झाले, तर विदेशी खेळाडूंच्या मानधनात कपात होईल, असेही बीसीसीआयने सांगितले .
विंडीज खेळाडूही नसणार?आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडनंतर सर्वाधिक सहभाग वेस्ट इंडिजच्या खेळाडूंचा आहे. आयपीएलमध्ये विंडीज खेळाडूंची मोठी क्रेझ आहे. वेस्ट इंडिजमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान कॅरेबियन प्रीमियर लीगचे (सीपीएल) आयोजन होणार आहे. अशा परिस्थितीत विंडीज खेळाडू आयपीएलसाठी उपलब्ध होण्याची शक्यता कमीच मानली जात आहे. याशिवाय बांगलादेशनेही आपल्या खेळाडूंना एनओसी देण्यास नकार दिल्याने आतापर्यंत आयपीएलच्या दुसऱ्या सत्रासाठी चार देशांच्या खेळाडूंचा सहभाग निश्चित मानला जात नाही.
...तर मिळणार बदली खेळाडू- यंदाच्या वर्षी टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार असून, या स्पर्धेआधी ऑस्ट्रेलियन संघ तीन ते चार मालिका खेळणार आहे. त्यामुळे आयपीएलच्या दुसऱ्या सत्रामध्ये कांगारुंचा सहभाग कठीण दिसत आहे. - आयपीएलमध्ये इंग्लंडच्या १२, तर ऑस्ट्रेलियाच्या १८ खेळाडूंचा समावेश आहे. पॅट कमिन्स, डेव्हिड वॉर्नर, जोश बटलर हे खेळण्याची शक्यता नाही.- या अडचणींवर मात करण्यासाठी बीसीसीआय विविध क्रिकेट बोर्डांशी चर्चा करणार आहे. खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी बीसीसीआय जुलै महिन्यापर्यंत प्रतीक्षा करण्याची शक्यता आहे. - जर काही विदेशी खेळाडू सहभागी होणार नसतील, तर त्यांच्या जागी बदली खेळाडू खेळविण्यची परवानगी फ्रेंचायसीना देण्यात येईल, अशी माहितीही सूत्रांनी दिली.