Join us  

Rohit Sharma: जेव्हा रोहित शर्माने काढल्या होत्या ५ चेंडूत मुंबई इंडियन्सच्या ४ विकेट!, असं कसं घडलं? 

IPL 2021, Rohit Sharma, Mumbai Indians: रोहित शर्माला (Rohit Sharma) आपण मुंबई इंडियन्स संघाचा (Mumbai Indians) कर्णधार म्हणून ओळखतोच पण आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सविरुध्दची सर्वोत्तम गोलंदाजीची कामगिरी याच रोहित शर्माच्या नावावर नावावर होती हे सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 11:42 AM

Open in App

-ललित झांबरेरोहित शर्माला (Rohit Sharma) आपण मुंबई इंडियन्स संघाचा (Mumbai Indians) कर्णधार म्हणून ओळखतोच पण आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सविरुध्दची सर्वोत्तम गोलंदाजीची कामगिरी याच रोहित शर्माच्या नावावर नावावर होती हे सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का? बहुधा नाहीच, कारण मुंबई इंडियन्सचा खेळाडू मुंबईच्याच संघाविरुद्ध कसा काय गोलंदाजी करेल? आणि दुसरं म्हणजे फलंदाज रोहित शर्मा गोलंदाजीत कसा चमकला? असे प्रश्न तुम्हाला पडतील. फलंदाजीत तर तो 'हिट' आहेच पण गोलंदाजीतही त्यानं भल्याभल्यांना तोंडात बोटं घालायला भाग पडेल अशी कामगिरी केलीय. याची आठवण आज होण्याचं कारण म्हणजे शुक्रवारी रॉयल चॕलेंजर्स  बंगलोरच्या (RCB)  हर्षल पटेलने (Harshal Patel)  काढलेल्या मुंबई इंडियन्सच्या पाच विकेट!  

धोनीचा धुमधडाका, दिल्लीला बसू शकतो मोठा फटका?  

मुंबई इंडियन्सचा निम्मा संघ हर्षलने एकट्यानेच आपल्या चार षटकात बाद केला आणि 4-0-27-5  असे विश्लेषण कमावले.  यासह आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्सविरुध्द सामन्यात पाच बळी मिळवणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला. 

याठिकाणी रोहित शर्मा पिक्चरमध्ये येतोय कारण याच्याआधीची मुंबई इंडियन्सविरुध्दची सर्वोत्तम गोलंदाजीची कामगिरी रोहित शर्माच्या नावावर होती. ही त्यावेळची गोष्ट आहे ज्यावेळी रोहित डेक्कन चार्जर्ससाठी खेळत होता आणि 6 मे 2009 रोजी सेंच्युरियन येथील सामन्यात त्याने दोनच षटकात,  हॕट्ट्रीकसह (Hattrick)  अगदी पाच चेंडूंच्या अंतरात  मुंबईचे चार गडी बाद केले होते. त्यावेळी त्याच्या गोलंदाजीचे विश्लेषण होते 2-0-6-4 आणि हीच आतापर्यंत मुंबईविरुध्द कोणत्याही गोलंदाजाची सर्वोत्तम कामगिरी होती जी आता हर्षल पटेलने आणखी सुधारली आहे.

आरसीबीत ‘हर्षल’लहर; पुन्हा मुंबई इंडियन्सची अपयशी सुरुवात

रोहित शर्माने त्यावेळी डावातील सातवा गोलंदाज म्हणून 16 व्या षटकात चेंडू हाती घेतल्यावर अभिषेक नायर व हरभजन सिंग यांना आपल्या पहिल्या षटकात लागोपाठच्या चेंडूवर बाद केले होते आणि पुढच्या षटकात पहिल्याच चेंडूवर जीन पॉल ड्युमिनीला बाद करत सलग तीन चेंडूवर तीन विकेट काढल्या होत्या पण दोन षटकात त्या विभागल्या गेल्याने ती हॕट्ट्रीक धरली गेली नाही. पुढे आणखी एका चेंडूनंतर सौरभ तिवारीला बाद करुन त्याने पाच चेंडूत हे चार बळी मिळवले होते. त्यामुळे तो सामना अर्थातच मुंबई इंडियन्सने गमावला होता आणि रोहितच सामनावीर ठरला होता. 

पुढे जाऊन 2011 पासून हाच रोहित मुंबई इंडियन्सच्या तंबूत आला आणि 2013 पासून त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.

टॅग्स :रोहित शर्मामुंबई इंडियन्सआयपीएल २०२१आयपीएल २०२१ मिनी ऑक्शन