-ललित झांबरे
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने (RCB) सनरायझर्सविरुध्द (SRH ) शाहबाज अहमदने (Shahbaz Ahmed) 7 धावात 3 गडी बाद करून गोलंदाजीत चमक तर दाखवलीच, त्याच्याकडून ते अपेक्षितही होते पण विराट कोहलीने (Virat Kohli) त्याला फलंदाजीत तिसऱ्या क्रमांकावर खेळवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मॕक्सवेल- डीविलियर्स यांच्याही पुढे विराटने त्याला खेळवले आणि त्याने 10 चेंडूत 14 धावा केल्या. याप्रकारे त्याचे फलंदाजीत फार काही योगदान नसले तरी त्याला विराटने तिसऱ्या क्रमांकावर खेळायला पाठवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
शाहबाजने याआधी 24 टी-20 सामने खेळले होते पण त्यात तो कधीही पाचव्या क्रमांकाच्या वर खेळला नव्हता. एवढेच नाही तर प्रथम श्रेणी व लिस्ट ए सामन्यातही तो कधी तिसऱ्या क्रमांकावर खेळलेला नव्हता. अशा एकूण 59 सामन्यात तो पहिल्यांदाच तिसऱ्या क्रमांकावर खेळला आणि त्याच्या 14 धावा ही त्याची टी-20 सामन्यातील सर्वोच्च खेळी ठरली. त्याची आधीची सर्वोच्च खेळी 13 धावांची होती. पण विराटने त्याला तिसऱ्या क्रमांकावर खेळवायचे आधीपासूनच ठरवून ठेवले होते.
शाहबाजची फलंदाजीत फारशी चमक नसली तरी त्याला मॕक्सवेल व डी' विलियर्सच्या आधी खेळायला पाठविण्यामागचे कारण कदाचित या दोघा दिग्गज फलंदाजांना डावात लवकर न उतरवण्याचे त्यांचे धोरण असावे. पहिल्या सामन्यातही आरसीबीने तिसऱ्या क्रमांकावर रजत पाटीदारला खेळवले होते. मात्र आता देवदत्त पडीक्कल संघात आल्याने रजत पाटीदारला बाहेर बसावे लागले. बहुधा म्हणून मग आरसीबीने शाहबाजला तिसऱ्या क्रमांकावर उतरवले असावे. शाहबाजने सुरुवातीपासून आक्रमक धोरण अवलंबले आणि कोहलीला स्थिरावण्याची संधी मिळाली.