मुंबई : गतविजेत्या मुंबई इंडियन्सला यंदाच्या आयपीएलमध्येही सलामीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. शुक्रवारी झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बगलोरविरुद्ध अखेरच्या चेंडूवर मुंबईचा पराभव झाला. विशेष म्हणजे आयपीएलच्या सलग नवव्या सत्रामध्ये मुंबईने सलामीला पराभव पत्करला आहे. २०१३ सालापासून एकदाही मुंबई इंडियन्सला आयपीएलचा पहिला सामना जिंकता आलेला नाही. या सामन्यात मुंबईकर गोलंदाजीमध्ये कमी पडले. मात्र आता मुंबईचा हुकमी अष्टपैलू लवकरच गोलंदाजी करताना दिसेल, असे मुंबई इंडियन्स संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक आणि क्रिकेट संचालक झहीर खान याने स्पष्ट केले आहे.
आयपीएल इतिहासावर नजर टाकल्यास दिसून येईल, की मुंबईने सातत्याने अपयशी सुरुवात केली आहे. मात्र, त्याचवेळी फिनिक्स भरारी घेत सर्वांना धक्के देण्याचा पराक्रमही केवळ मुंबईनेच केला आहे. त्यामुळेच, आयपीएलमध्ये कोणताही संघ मुंबई इंडियन्सविरुद्ध हलगर्जीपण करताना दिसत नाही. त्यातच शुक्रवारी झालेल्या पहिल्या सामन्यात गोलंदाजीमधील उणीवा समोर आल्यानंतर त्या दूर करण्यावर संघाने भर दिल्याचे दिसून आले.
मंगळवारी मुंबईकर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध भिडतील. या सामन्याआधी झहीर खानने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुंबईचा हुकमी अष्टपैलू लवकरच गोलंदाजी करताना दिसेल, असे स्पष्ट केले. हा प्रमुख खेळाडू म्हणजे हार्दिक पांड्या. हार्दिकने आयपीएलआधी झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत गोलंदाजी केली. मात्र त्यानंतर त्याच्या खांद्याच्या दुखापतीने पुन्हा डोके वर काढले. त्यामुळेच त्याने पहिल्या सामन्यात गोलंदाजी केली नव्हती.
झहीर खाने म्हटले की, ‘एक अष्टपैलू म्हणून हार्दिक आमच्यासाठी पूर्ण पॅकेज आहे. प्रत्येक जण आता कोलकाताविरुद्ध विजय मिळवण्यास आसुसले आहेत. त्यामुळे संघात नवा आत्मविश्वास संचारला आहे. हार्दिकही खूप मेहनत घेत असून लवकरच सर्वजण त्याला गोलंदाजी करताना पाहतील.’ हार्दिकने गोलंदाजी केल्यास मुंबईच्या गोलंदाजीला आणखी बळकटी येईल. जसप्रीत बुमरात, ट्रेंट बोल्ट, राहुल चहर, मार्को जेन्सन आणि कृणाल पांड्या अशी तगडी गोलंदाजी असलेल्या मुंबईसाठी हार्दिकचा मारा महत्त्वपूर्ण ठरेल. तसेच गरज पडल्यास किएरॉन पोलार्ड हाही मुंबईसाठी गोलंदाजीत योगदान देऊ शकतो, असेही झहीरने यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे आता प्रतिस्पर्धी संघांना मुंबईविरुद्ध खेळताना अधिक मजबूत रणनिती आखावी लागेल हे नक्की.
Web Title: IPL 2021 Will Hardik Pandya bowl or not Coach Zaheer Khan made it clear
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.