-ललित झांबरे
आयपीएलचे (IPL) 14 वे सत्र सुरू आहे आणि ते विशेष ठरतेय. याआधीच्या 13 सत्रांपेक्षा या सत्राची सुरूवात वेगळी झाली आहे. वेगळी म्हणजे कशी, तर एवढ्या वर्षात हे पहिले असे सत्र आहे ज्यात पहिल्या तीन सामन्यांचे सामनावीर भारतीय खेळाडू आहेत. यापूर्वी असे कधी झाले नव्हते.
यंदाच्या सलामी सामन्यात रॉयल चॅलेंजर्सचा (RCB) हर्षल पटेल (Harshal Patel) सामनावीर ठरला होता. ज्याने मुंबई इंडियन्सचा निम्मा संघ गारद केला होता. दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या (DC) शिखर धवनने (Shikhar Dhawan) सुपर किंग्जच्या गोलंदाजांची धुलाई करत 54 चेंडूत 85 धावा केल्या आणि नंतर तीन झेलसुध्दा घेतले. त्यामुळे शिखर सामनावीराचा मानकरी ठरला. तर रविवारी कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) सलामीवीर नितीश राणा (Nitish Rana) याने 56 चेंडूत 80 धावांची खेळी करत सामनावीराचा पुरस्कार जिंकला.
अशाप्रकारे यंदाच्या पहिल्या तीन सामन्यात सामनावीर ठरलेले- हर्षल पटेल, शिखर धवन व नितीश राणा हे तिन्ही भारतीय खेळाडू आहेत आणि आयपीएलच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले आहे. म्हणून यंदाची इंडियन प्रीमियर लिग खऱ्या अर्थाने इंडियन ठरत आहे.
यात विशेष म्हणजे यापैकी हर्षल पटेल व नितीश राणा हे अनकॅप्ड खेळाडू आहेत आणि भारतीय क्रिकेटमध्ये प्रतिभावान खेळाडूंची कमी नाही हेच त्यातून दिसून येत आहे.