शारजा : शानदार कामगिरीसह सामन्यावर वर्चस्व राखूनही मोक्याच्या क्षणी कच खाणाऱ्या पंजाब किंग्जपुढे शनिवारी सनरायझर्स हैदराबादचे आव्हान असेल. हैदराबाद सध्या गुणतालिकेत तळाला असले, तरी ते पंजाबची वाट बिकट करू शकतील. त्यामुळेच पंजाबला सावध होऊन खेळावे लागेल.
प्ले ऑफच्या शर्यतीतून हैदराबादचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. मात्र, असे असले तरी ते याच कारणामुळे आता धोकादायक संघ बनले आहेत. एक विजय मिळवून ते कोणत्याही संघाचे समीकरण बिघडवू शकतात, त्यामुळे पंजाबपुढे त्यांचे मोठे आव्हान असेल. हैदराबादच्या खात्यावर आतापर्यंत केवळ २ गुणांची नोंद असून त्यांनी एकच विजय मिळवला आहे. पंजाब सहा गुणांसह सातव्या स्थानी आहे.
कर्णधार लोकेश राहुल आणि मयांक अग्रवाल यांची सलामी पंजाबसाठी उजवी ठरत आहे. मात्र, मधल्या फळीचे अपयश त्यांना महागडे ठरत आहे. राजस्थानविरुद्ध धडाकेबाज ख्रिस गेलला संघाबाहेर बसविण्याचा पंजाबचा निर्णय चुकीचा ठरला. त्यामुळे आता त्याला संघाबाहेर ठेवण्याची चूक पंजाब करणार नाही.
प्ले ऑफच्या आशा जवळपास संपुष्टात आल्याने हैदराबाद संघ आता कोणत्याही दडपणाशिवाय खेळेल.