IPL 2022, इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाआधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने BCCI दुखापतग्रस्त खेळाडूंसाठी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) १० दिवसांचे फिटनेस कॅम्प भरवले आहे. पण, त्यात न जाता अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) याने अहमदाबाद येथेच तंदुरूस्तीसाठी मेहनत घेणार असल्याचे कळवले. मात्र, निवड समितीने दम भरला आणि हार्दिकला यू टर्न घ्यावा लागला. आता हार्दिक फिटनेस कॅम्पसाठी NCA मध्ये दाखल होण्यास तयार झाला आहे.
''होय, हार्दिक पांड्या कॅम्पमध्ये दाखल होणार आहे. कॅम्पसाठी बोलावण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये त्याचा समावेश नव्हता, त्यानं त्याच्या तंदुरुस्तीबाबत कोणतेच अपडेट दिले नव्हते. पण, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी विचार केला जाऊ शकतो, असे संकेत निवड समितीने त्याला दिले. त्यानतंर त्याचे नाव या यादीत समाविष्ठ करण्यात आले. मंगळवारी तो कॅम्पमध्ये दाखल होईल,''असे बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने InsideSport.ला सांगितले.
हार्दिक NCA कॅम्पला सतत दांडी मारत होता आणि त्यावरून निवड समिती नाराज होती. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघाच्या शर्यतीत अजूनही हार्दिक पांड्या आहे. पण, त्याने मुंबई व अहमदाबाद येथेच तंदुरुस्तीवर काम करण्याचा निर्णय घेतला होता. पण, निवड समिती अध्यक्षांचा एक फोन गेला अन् हार्दिकनं निर्णय बदलला. आता हार्दिकच्या तंदुरुस्तीवर NCA त लक्ष ठेवले जाईल आणि तो आयपीएल २०२२ साठी फिट झाल्यास त्याचा जूनमध्ये होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठीही विचार केला जाईल.
BCCIने मागील आठवड्यात इशान किशन, भुवनेश्वर कुमार व वेंकटेश अय्यर यांच्यासह २५ खेळाडूंना NCA कॅम्पमध्ये दाखल होण्यास सांगितले होते. NCA अध्यक्ष व्ही व्ही एस लक्ष्मण यांच्या देखरेखीखाली हा कॅम्प भरवला गेला आहे. हार्दिकचा भाऊ कृणाला याला मात्र या कॅम्पसाठी बोलावलेले नाही.