पुणे - पाच वेळचे आयपीएल विजेते असलेल्या मुंबई इंडियन्सची यंदाच्या आयपीएलमध्ये निराशाजनक कामगिरी होत आहे. काल पंजाब किंग्सविरुद्ध झालेल्या लढतीतही मुंबईला पारभव पत्करावा लागला. मुंबईचा हा सलग पाचवा पराभव ठरला आहे. दरम्यान, या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि संघातील इतर खेळाडूंना अजून एक धक्का बसला आहे. पंजाब किंग्सविरुद्धच्या लढतीत स्लो ओव्हर रेटमुळे रोहित शर्मासह संपूर्ण संघावर जबर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
आयपीएलच्या कोड ऑफ कंडक्टनुसार स्लो ओव्हर रेटसंबंधीची चूक होण्याची मुंबई इंडियन्सची यंदाच्या हंगामातील ही दुसरी वेळ होती. त्यामुळे कर्णधार रोहित शर्माला २४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तर संघातील इतर खेळाडूंवर ६ लाख रुपये किंवा सामन्यातीत मानधनाच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल, एवढा दंड ठोठावण्यात आला आहे. तत्पूर्वी आयपीएल २०२२मधील दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या आपल्या पहिल्या सामन्यामध्येही मुंबई इंडियन्सवर कारवाई झाली होती. त्यावेळी मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.
यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी काहीही सकारात्मक होताना दिसत नाही आहे. पंजाब किंग्सविरुद्धही मुंबईचा संघ १२ धावांनी पराभूत झाला. पुण्यामध्ये झालेल्या या सामन्यात पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांमध्ये ५ विकेट्सच्या मोबदल्यात १९८ धावा जमवल्या होत्या. पंजाबकडून शिखर धवनने ७० तर कर्णधार मयंक अग्रवालने ५२ धावा काढल्या. १९९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला ९ बाद १८६ धावाच जमवता आल्या.
Web Title: IPL 2022: Another blow to Mumbai Indians after fifth straight defeat, big action against entire team including captain Rohit Sharma
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.