Sachin Tendulkar on Anuj Rawat: IPL 2022 च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) चा ७ गडी राखून पराभव केला. सामन्यात २२ वर्षीय युवा यष्टीरक्षक फलंदाज अनुज रावतने सामनावीराचा किताब पटकावला. त्याने RCBकडून खेळताना ४७ चेंडूत ६६ धावा केल्या. आपल्या खेळीत अनुजने मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई करताना ६ उत्तुंग असे षटकार आणि २ चौकार लगावले. त्याच्या खेळीवर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर प्रसन्न झाला आणि त्याने अनुज रावतला एक मोलाचा सल्लाही दिल्याचे अनुजने सांगितले.
गेल्या ६-७ सामन्यांमध्ये अनुजची बॅट चालली नव्हती. पण मुंबई इंडियन्सविरूद्ध त्याने दमदार ६६ धावांची खेळी केली. सामना संपल्यानंतर अनुजने सचिनशी संवाद साधला आणि खराब फॉर्मनंतर स्वत:मध्ये सुधारणा कशी करावी, याबाबत सल्ला मागितला. यावर सचिन म्हणाला की, खेळताना तुझं मन अगदी स्पष्ट ठेव आणि सतत स्वत:चा खेळ सुधारण्यावर लक्ष केंद्रित कर. असं केलंस तर तुला खेळात सतत पुढे जाण्यास मदत होईल, असा सल्ला सचिनने अनुजला दिला.
अनुज रावतने या मोसमात आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत. गेल्या तीन सामन्यांमध्ये त्याने पॉवरप्लेमध्ये मोठी फटका मारण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावली. त्यामुळे तो यशस्वी होऊ शकला नाही. पण मुंबईविरुद्धच्या सामन्यात रावतने सेट व्हायला थोडा वेळ घेतला. पॉवरप्लेमध्ये सावधपणे खेळून मग त्याने फटकेबाजी केली. त्याने सहकारी खेळाडू मोहम्मद सिराजलाही सांगितले होते की, यावेळी तो खेळ संपवूनच परतेल.
Web Title: ipl 2022 anuj rawat reveals valuable advice from sachin tendulkar Mumbai Indians after rcb vs mi match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.