R Ashwin Retired Out, IPL 2022: आयपीएलच्या १५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एक विचित्र गोष्ट घडली. रविवारी लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू असताना अचानक राजस्थान रॉयल्सचा फलंदाज रविचंद्रन अश्विन फलंदाजी सोडून मैदानाबाहेर गेला. हे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. नक्की काय झालं ते कळू शकलं नाही. पण तो 'रिटायर्ड आऊट' झाल्याचे समजले आणि त्यानंतर रियान पराग क्रिजवर आला. घडलेल्या प्रकारानंतर तो निर्णय नक्की अश्विनचा होता की कर्णधार संजू सॅमसनचा होता की अन्य कोणाचा होता यावर चर्चा रंगली. अखेर राजस्थान संघाचे कोच कुमार संगकाराने याबद्दलची माहिती दिली.
कुमार संगकारा म्हणाला, "रविचंद्रन अश्विनने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रिटायर्ड आऊट होऊन सामन्याची परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली. रासी व्हॅन डर डुसेनच्या आधी रियान परागला न पाठवण्याची चूक झाली होती. रियान परागच्या फलंदाजी योग्य वापर करणं आम्हाला जमलं नव्हतं, पण अश्विनने स्वतः निर्णय घेतला आणि तो परिस्थिती पाहून फलंदाजी सोडून बाहेर गेला. २८ धावा करून तो माघारी परतला. त्यानंतर रियान परागने चांगली कामगिरी केली."
दरम्यान, हंगामातील पहिला सामना खेळत असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या व्हॅन डर डुसेनला शिमरॉन हेटमायर, अश्विन आणि पराग यांच्या पुढे चौथ्या क्रमांकावर पाठवण्यात आले, परंतु तो केवळ चार धावा करू शकला. त्यानंतर अश्विन खेळायला आला पण सामन्याची स्थिती पाहून तो रिटायर्ड आऊट होत तंबूत गेला आणि त्याजागी रियान परागने शेवटच्या षटकांत फटकेबाजी केली.
दरम्यान, या सामन्याच शेवटच्या षटकात राजस्थानने लखनौ सुपर जायंट्सचा ३ धावांनी पराभव केला.