आयपीएलच्या मेगा लिलावात भारतीय खेळाडूंवर संघ मालकांनी कोट्यवधींची उधळण केली. यात ११ खेळाडूंना १० कोटींहून अधिक बोली लागली. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं. विशेष म्हणजे यंदाच्या लिलावात सर्वाधिक बोली मिळवण्यात भारतीय खेळाडूंनी परदेशी खेळाडूंवर मात केली. सर्वाधिक बोली प्राप्त झालेल्या भारतीय खेळाडूंपैकी गोलंदाज दीपक चहर याचाही समावेश आहे. डावखुऱ्या गोलंदाजांवर चेन्नई सुपर किंग्जनं पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्याच्यासाठी तब्बल १४ कोटी मोजले. यंदाच्या लिलावात इशान किशननंतर सर्वाधिक बोली दीपक चहर यालाच मिळाली. तब्बल १४ कोटींची बोली आणि ज्या संघात कामगिरी केली त्याच संघानं पुन्हा एकदा विश्वास दाखवल्याबद्दल दीपक चहर खूप आनंदी आहे. पण असं असूनही त्याला एका गोष्टीचं दु:ख आहे.
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक बोली प्राप्त झालेला भारतीय वेगवान गोलंदाज ठरलेल्या दीपक चहरसोबतच त्याचा भाऊ फिरकीपटू राहुल चहल याचा देखील लिलावात समावेश होता. राहुल चहरवरही चांगली बोली लागली आणि दीपकला आशा होती की यावेळी तर राहुलसोबत एकाच संघात खेळण्याचं स्वप्न साकार होऊ शकेल. पण तसं घडलं नाही. चहर बंधू २०१७ आणि २०१८ साली रायझिंग पुणे सुपरजाएंट्स संघात होते. पण मैदानात एकत्र खेळण्याची त्यांना एकदाची संधी मिळाली नव्हती. एका सामन्यात दीपक होता पण त्या सामन्यात राहुलला संधी मिळाली नव्हती. तर ज्या सामन्यात राहुल खेळला त्या सामन्यात दीपक चहर बाहेर होता.
ईएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत दीपक चहरनं याच गोष्टीचं वाईट वाटत असल्याचं म्हटलं आहे. पण त्यासोबतच पुढच्या आयपीएलमध्ये राहुलला मी चेन्नई सुपरकिंग्ज संघात यायला सांगेन अशी मिश्किल टीप्पणी देखील त्यानं केली.
"पुण्याच्या संघात मी पहिला सामना खेळलो. तर दुसऱ्या सामन्यात राहुल खेळला. तिसरा मी खेळलो आणि चौथ्या सामन्यात राहुल. पण आम्ही दोघं एकाच वेळी एकाच संघात कधीच खेळू शकलो नाही. यावेळीच्या लिलावात तरी आम्ही दोघं एका संघाकडून खेळू शकू असा विचार मी करत होतो. पण तसं होऊ शकलं नाही. मी पुढच्यावेळेस राहुलला सांगेन की पंजाबसोडून तू चेन्नईच्या संघात ये", असं दीपक चहर म्हणाला.
पंजाब किंग्जनं राहुलसाठी मोजले कोट्यवधीदीपक चहर याला संघात दाखल करुन घेण्यासाठी चेन्नईनं १४ कोटी मोजले तर लेग स्पीनर राहुल चहल याच्यासाठी पंजाब किंग्ज संघानं ५.२५ कोटी रुपये मोजले. याआधी राहुल चहल मुंबई इंडियन्सकडून खेळत होता. पण गेल्या वर्षी त्याला रिलीज करण्यात आलं होतं. पंजाब किंग्जच्या अंतिम ११ जणांच्या यादीत राहुल चहर याला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण संघाकडे फिरकीपटूंचे खूप कमी पर्याय उपलब्ध आहेत.