मुंबई: आयपीएल २०२२ च्या मेगा ऑक्शननं दिग्गजांना धक्का दिला. सुरेश रैना, इयन मॉर्गन यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंना कोणीच संघात घेतलं नाही. तर दुसरीकडे अनेक तरुण खेळाडू भाव खाऊन गेले. उत्तर प्रदेशचा वेगवान गोलंदाज यश दयाल हा त्यापैकीच एक. लिलावावेळी त्याचं नाव उच्चारलं गेलं, त्यावेळी ते फारसं कोणाला माहीत नव्हतं. मात्र गुजरात टायटन्सनं बेस प्राईसपेक्षा १६ पट किंमत मोजत यशला आपल्या ताफ्यात घेतलं.
यशची बेस प्राईज २० लाख रुपये होती. मात्र गुजरातनं ३ कोटी २० लाख रुपयांची बोली लावत यशला संघात घेतलं. आपल्यासाठी बोली लागेल अशी अपेक्षा यशला नव्हती. सध्या यश रणजी करंडक स्पर्धेसाठी गुरुग्राममध्ये आहे. संघासोबत एका हॉटेलमध्ये थांबलेला यश आयपीएल लिलाव पाहत होता. पण बराच वेळ नाव येत नसल्यानं त्यानं टीव्ही बंद केला. फोन सायलेंटवर ठेवला आणि झोपून गेला.
एका तासानंतर यश उठला. त्यानं फोन तपासला. कुटुंबातील सदस्यांचे, नातेवाईकांचे, मित्रांचे असंख्य मिस्ड कॉल येऊन गेले होते. वडील चंद्रपाल दयाल यांचे २० मिस्ड कॉल पाहून यशनं त्यांना कॉल केला. तेव्हा आयपीएलसाठी निवड झाल्याची बातमी यशला समजली. आपल्यासाठी तब्बल ३ कोटी २० लाखांची बोली लागली हे ऐकून त्याला आश्चर्याचा धक्काच बसला.
यश फोन घेत नसल्यानं वडील चंद्रपाल यांना चंद्रपाल यांना चिंता वाटू लागली. 'तो फोन उचलत नसल्यानं आम्ही चिंतेत होतो. मी त्याला लिलावाबद्दल सांगितलं. तर त्याला वाटलं मी मस्करी करतोय. तो क्वारंटिनमध्ये असल्यानं संघातील खेळाडूदेखील त्याच्या खोलीत गेले नाहीत. त्यामुळे आयपीएल लिलावात त्याच्यासाठी लागलेल्या बोलीबद्दल तो अनभिज्ञ होता,' असं वडील चंद्रपाल यांनी सांगितलं.