मुंबई: आयपीएल २०२२ च्या मेगा ऑक्शननं दिग्गजांना धक्का दिला. सुरेश रैना, इयन मॉर्गन यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंना कोणीच संघात घेतलं नाही. तर दुसरीकडे अनेक तरुण खेळाडू भाव खाऊन गेले. हैदराबादचा फलंदाजी तिलक वर्मा हा त्यापैकीच एक. मुंबई इंडियन्सनं १.७ कोटी रुपयांची बोली लावत तिलकला आपल्या संघात घेतलं. विशेष म्हणजे तिलकची बेस प्राईज २० लाख रुपये इतकी होती. मात्र त्यापेक्षा आठपट रक्कम मुंबईनं मोजली.
हैदराबादच्या रणजी संघाकडून खेळणाऱ्या तिलक वर्माला आपल्याकडे खेचण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये जोरदार चढाओढ पाहायला मिळाली. मात्र मुंबईनं तिलकला आपल्याकडे खेचण्यात यश मिळवलं. बंगळुरूच्या आयटीसी गार्डनिया हॉटेलमध्ये आयपीएल २०२२ साठीचा लिलाव सुरू होता. त्याचवेळी ओदिशाच्या कटकमध्ये जबरदस्त वातावरण होतं.
कटकमध्ये असलेला तिलक वर्मा त्याच्या मित्रासोबत लिलाव पाहत होता. वर्मासाठी बोली लागताच त्याचे मित्र चीयर करत होते. प्रत्येक बोलीनंतर उत्साह वाढत होता. आपल्या दोस्तासाठी दोन बड्या संघांमध्ये चाललेला संघर्ष पाहून त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. सध्या तिलक वर्मा रणजी स्पर्धेत खेळत असून तो हैदराबादच्या संघाचा सदस्य आहे.
मूळचा हैदराबादचा असलेल्या तिलक वर्मानं १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. त्याआधी हैदराबादमध्ये १६ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धांमध्ये त्यानं चमकदार कामगिरी केली आहे. मागील १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारतानं अंतिम फेरी गाठली. त्यात तिलकची कामगिरी चांगली झाली होती.