IPL 2022 Auction: इंडियन प्रीमिअर लीग २०२२ साठीच्या खेळाडूंचा लिलाव येत्या शनिवारी आणि रविवारी होणार आहे. आयपीएलमध्ये यंदाच्या दोन नव्या संघांसह एकूण १० संघांसाठी दिग्गज खेळाडूंची निवड केली जाणार आहे. आपल्याला हवा तो खेळाडू संघात दाखल करुन घेण्यासाठी यावेळी कोटीच्या कोटी उड्डाणं होण्याची शक्यता आहे. यात कोणत्या खेळाडूवर कोणता संघ राशीच्या राशी ओततो ते पाहावं लागणार आहे. तर काही खेळाडूंची अपेक्षित बोली न मिळाल्यानं निराशा होण्याचीही शक्यता आहे. पण अशातच एक खेळाडू असा की जो यावेळीची आयपीएल खेळणार नसला तरी त्याच्यावर कोट्यवधींची बोली लावली लावून संघात दाखल करुन घेतलं जाऊ शकतं. तो खेळाडू आहे इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर ज्याची लिलावासाठीची मूळ किंमत (बेस प्राइज) २ कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे.
जोफ्रा आर्चर याच्यावर सीक्रेट बोली लावून त्याला संघात दाखल करुन घेतली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पण सीक्रेट बोली म्हणजे काय? आणि जोफ्रा आर्चर सामन्यांना उपलब्ध नसतानाही त्याला खरेदी करण्यासाठी संघ स्वारस्य का दाखवतील? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर त्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे.
जोफ्रा आर्चर याला आयपीएल लिलावात सायलेंट टाय-ब्रेकर नियमाअंतर्गत खरेदी केलं जाऊ शकतं. आर्चरच्या कोपरावर शस्त्रक्रिया झाली आहे आणि तो यंदाच्या सीझनमध्ये खेळणार नाही. असं असतानाही त्यानं आपलं नाव लिलावासाठी दाखल केलं आहे. २०२० मध्ये आर्चर राजस्थान रॉयल्सकडून खेळला होता आणि त्याला स्पर्धेच्या सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देखील प्राप्त झाला होता. आर्चरच्या गोलंदाजीची क्षमता आणि त्याची हीच उपयुक्तता लक्षात घेता प्रत्येक संघाची अशा खेळाडूला आपल्या ताफ्यात राखीव ठेवण्याची इच्छा असेल.
सायलेंट-टायब्रेकरमध्ये जोफ्राचा लिलाव होणार?२०१० सालापासून आयपीएल खेळाडूंच्या लिलावात सायलेंट टायब्रेकर नियम लागू झाला. याअंतर्गत एखाद्या संघाला कोणत्याही एका खेळाडूला खरेदी करण्याची इच्छा असेल व त्या खेळाडूवर बोली लावताना संघाकडे उपलब्ध असलेली संपूर्ण रक्कम संपली आणि तरीही संबंधित खेळाडूवरची बोली सुरूच राहिली तर टायब्रेकर नियम लागू होतो. अशावेळी दोन्ही संघांना संबंधित खेळाडूसाठी सीक्रेट बोली कागदावर लिहून द्यावी लागते. ज्या संघाची बोली अधिक असते अशा संघात संबंधित खेळाडूला दाखल केलं जातं.
२०१० साली कायरन पोलार्ड आणि शेन बॉण्ड यांच्या लिलावावेळी असं घडलं होतं. तर २०१२ साली चेन्नई सुपरकिंग्ज संघानं रविंद्र जडेजा याला अशाच पद्धतीनं आपल्या संघात दाखल करून घेतलं होतं. यावेळी जोफ्रा आर्चरसाठी देखील असंच काहीसं होऊ शकतं. म्हणजेच जोफ्रा आर्चरसाठी संघ मालक लिलावाच्या दुसऱ्या दिवशी उत्सकता दाखवू शकतात. कारण त्यावेळी बहुतेक संघांच्या खात्यात जास्त पैसेही शिल्लक राहिलेले नसतील आणि टायब्रेकरच्या नियमाअंतर्गत त्याला खरेदी केलं जाऊ शकेल.