IPL 2022: भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज सात वर्षांच्या बंदीनंतर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. आयपीएलच्या यंदाच्या लिलावात श्रीशांत यानं स्वत:चं नाव दाखल केलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार श्रीशांतनं त्याची बेसप्राइज ५० लाख रुपये इतकी ठेवली आहे. श्रीशांत आयपीएलमध्ये अखेरचा राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळला होता आणि याच संघाकडून खेळताना २०१३ साली फिक्सिंग प्रकरणात त्याचं नाव समोर आलं. श्रीशांतसोबतच संघातील आणखी दोन खेळाडूंचं नाव यात समोर आलं होतं. आयपीएलच्या यंदाच्या मेगा लिलावासाठी एकूण १२१४ खेळाडूंनी आपलं रजिस्ट्रेशन केलं आहे. यातून एकूण ६०० खेळाडूंची लिलावासाठी निवड करण्यात आली आहे.
मॅच फिक्सिंगचा आरोप सिद्ध झाल्यानंतर बीसीसीआयनं श्रीशांतवर आजीवन बंदी लावली होती. पण त्याविरोधात श्रीशांत यानं खूप मोठी लढाई लढली. सुप्रीम कोर्टापर्यंत हे संपूर्ण प्रकरण गेलं आणि अखेरीस श्रीशांत याला दिलासा मिळाला. त्याच्यावरील कायमस्वरुपाची बंदी हटविण्यात आली.
स्थानिक क्रिकेटमध्ये केलं पुनरागमनबंदी हटल्यानंतर श्रीशांतनं स्थानिक क्रिकेटमध्येही पुनरागमन केलं होतं. २०२१ मध्ये सय्यद मुश्ताक अली करंडक आणि विजय हजारे करंडक स्पर्धेत केरळचं प्रतिनिधीत्व केलं होतं. त्यानंतर २०२१ मध्येही श्रीशांतनं आयपीएल लिलावासाठी स्वत:चं नाव दाखल केलं होतं. पण कोणत्याही संघानं त्याच्यात स्वारस्य दाखवलं नाही. त्यावेळी श्रीशांतनं ७५ लाख बेसप्राइज ठेवली होती.