मुंबई-
आयपीएल २०२२ लिलावात कोलकाता नाइट रायडर्स संघानं (KKR) एका टेनिस बॉल क्रिकेटरचा संघात समावेश केला आहे. केकेआरनं जेव्हा या खेळाडूला संघात दाखल केलं त्यावेळी संघ मालक आणि व्यवस्थापकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. इतर संघांच्या टेबलवरही कोलकाताच्या या खेळीबाबत आश्चर्य व्यक्त केलं गेलं. या खेळाडूचं नाव आहे रमेश कुमार. कोलकाताना रमेश कुमार याला अवघ्या २० लाखांच्या बेस प्राइजमध्येच संघात दाखल करुन घेतलं. रमेश कुमारचं नाव लिलावाच्या दुसऱ्या दिवशी अगदी शेवटच्या क्षणाला आलं होतं. पण त्याच्याबद्दलची माहिती उपलब्ध नव्हती. कारण रमेश कुमारनं अद्याप एकदाही व्यावसायिक पातळीवर क्रिकेट खेळलेलं नाही. त्यामुळेच कोलकोतानं लावलेल्या बोलीनं सर्वच अवाक् झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार रमेश कुमार पंजाबचा आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये रमेश कुमार याचं खूप मोठं नाव आहे आणि टेनिस बॉल क्रिकेट सुपरस्टार म्हणून तो ओळखला जातो. टेनिस क्रिकेट विश्वात रमेश कुमारनं नारायन जलालाबादिया नावानं खूप प्रसिद्ध प्राप्त केली आहे. लिलावाआधी त्यानं केकेआर संघासाठी ट्रायल देखील दिला होता. रमेश कुमार एक उत्तम फलंदाज असून उत्तुंग षटकार मारण्यासाठी तो लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे रमेश कुमार गोलंदाजी देखील करू शकतो. पण कोलकातानं रमेश कुमारवर एक फलंदाज म्हणूनच बोली लावली आणि त्याला संघात दाखल करुन घेतलं आहे.
शाहरुख खानची मालकी असलेल्या केकेआर संघानं रमेश कुमार याला संघात अखेरचा खेळाडू म्हणून स्थान दिलं आहे. Narine Jalalabadiya नावानं रमेश कुमार युट्यूबवर प्रसिद्ध आहे आणि त्याचे अनेक व्हिडिओ हिट आहेत. यात तो उत्तुंग षटकार लगावताना दिसतो. आता आयपीएल २०२२ मध्ये केकेआरच्या संघात अंतिम ११ खेळाडूंमध्ये रमेश कुमारला स्थान मिळतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
कोलकाता नाइट रायडर्सचा संपूर्ण संघ-व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, श्रेयस अय्यर, शेल्डन जॅक्सन, अजिंक्य रहाणे, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरीन, पॅट कमिन्स, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, सॅम बिलिंग्ज, अनुकूल रॉल, रसिख सलाम, अभिजीत तोमर, प्रथम सिंह, अमन खान, रमेश कुमार, अशोक शर्मा, टीम साऊदी, एलेक्स हेल्स, मोहम्मद नबी, उमेश यादव, बी इंद्रजीत, चमिका करुणारत्ने.