इंडियन प्रीमियर लीग २०२२ (Indian Premier League 2022) च्या 15 व्या हंगामाच्या लिलाव प्रक्रियेसाठी आता केवळ अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहेत. आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी लिलाव प्रक्रिया या महिन्यात १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बेंगळुरूमध्ये पूर्ण होईल. लिलाव प्रक्रियेपूर्वी बीसीसीआयने (BCCI) खेळाडूंची यादी जाहीर केली. या यादीत ५९० खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. सहभागी ५९० क्रिकेटपटूंपैकी, एकूण २२८ कॅप्ड (आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत), तर ३५५ खेळाडू असे आहेत ज्यांनी त्यांच्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केलेलं नाही. याशिवाय सात सहयोगी (Associates) देशांच्या खेळाडूंचा समावेश आहे.
बीसीसीआयने निवडलेल्या खेळाडूंमध्ये देशाचा ३८ वर्षीय वेगवान गोलंदाज एस. श्रीसंत (S. Sreesanth) याचीही निवड झाली आहे. टीम इंडियातून बाहेर पडलेल्या या भारतीय वेगवान गोलंदाजाने आगामी लिलावासाठी त्याची बेस प्राईज ५० लाख रुपये ठेवली आहे. यापूर्वी, त्याने मागील हंगामासाठी म्हणजेच आयपीएल २०२१ साठी त्याची बेस प्राईज ७५ लाख रुपये ठेवली होती.