आयपीएलच्या मेगा लिलावानंतर अनेक खेळाडू आपल्या जुन्या संघाऐवजी आता नव्या संघात सामील झाले आहेत. यात असे काही खेळाडू आहेत की जे गेल्या बऱ्याच वर्षांपासून आयपीएलमध्ये एकाच संघाकडून खेळत होते. पण यंदाच्या लिलावानंतर या खेळाडूंना नवा संघ मिळाला आहे आणि अशा खेळाडूंची यादी तयार कराची झाल्यास यात भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल याचं नाव सर्वात पहिलं घेतलं जाईल. चहल याला यंदाच्या लिलावात राजस्थान रॉयल्स संघानं बोली लावली. गेल्या अनेक वर्षांपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून चहल प्रतिनिधीत्व करत होता. पण यावेळी संघानं त्याला रिलीज केलं होतं. चहल याला रिटेन न केल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता आणि आता जेव्हा चहल याला नवा संघ मिळाला असताना त्याची पत्नी धनश्री वर्मा हिनं सोशल मीडियात केलेल्या पोस्टनं नव्या वादाला फोडणी मिळाली आहे.
राजस्थान रॉयल्सनं लिलावात चहलवर ६.२५ कोटींची बोली लावत संघात दाखल करुन घेतलं. राजस्थानच्या संघाचा भाग झाल्यानंतर धनश्री वर्मा हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. यात तिनं युजवेंद्र सोबतचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. पण त्यासोबतच तिनं तिच्या भावना देखील शब्दांत मांडल्या आहेत.
"प्रत्येकाच्या आयुष्यात प्रगतीसाठी स्वत:मध्ये बदल करण्याची गरज असते. यातून तुमच्यातील क्षमता आणि आव्हानांची व्याप्ती वाढते. 'मिस्टर रॉयल' युजवेंद्र चहल आता राजस्थान रॉयल्सचा भाग झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन", असं म्हटलं आहे.
आरसीबी आणि चहलमधील नात्यात वितुष्ट?चहल जवळपास ७-८ वर्षांपासून आरसीबीकडून खेळत होता. प्रत्येक वेळाला फ्रँचायझीनं त्याला रिटेन केलं आहे. पण यावेळी संघानं तसं केलं नाही आणि यावर सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं. यामागचं कारण काही समोर आलं नाही. पण धनश्रीनं केलेल्या पोस्टनंतर आता याला वेगळच वळण मिळालं आहे. या पोस्टमुळे चहल आणि आरसीबी यांच्यातील संबंध बिघडले होते असं दिसून येत आहे.
धनश्री पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाली?"तू नेहमीच प्रामाणिक, विनम्र आणि आपल्या जुन्या संघासाठी गेम चेंजर राहिला आहेस. आता वेळ आली आहे नव्या सुरुवातीसाठी आपलं १०० टक्क्यांहून अधिक देण्याची. तुझ्या आजूबाजूच्यांना सत्य काय आहे आणि काय घडलं आहे याची पुरपूर कल्पना आहे हे नेहमी लक्षात ठेव. मी नेहमीच तुझ्या चांगल्याचा विचार करेन कारण त्यासाठी तू पात्र आहेस. यासोबतच तू आपल्या दोघांच्याही प्रोशनल आयुष्याची कधीच तुलना केली नाहीस आणि जेव्हा जेव्हा माझ्या अधिकारांची गोष्ट आली तेव्हा तू माझ्या अधिकारांसाठी लढलास. तू नेहमीच आपल्या दोघांचही करिअर समान असल्याचं मानत आला आहेस आणि सगळं काही छानच होणार आहे", असं धनश्रीनं पोस्टमध्ये म्हटलं आहे.
आरसीबीसाठी सर्वात यशस्वी गोलंदाज असूनही संघानं नाही लावली बोलीआरसीबीनं यंदाच्या लिलावाआधी विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज यांना रिटेन केलं. संघाकडे चौथ्या खेळाडूला रिटेन करण्याचा पर्याय होता. पण तसं केलं गेलं नाही आणि चहल याला रिलीज करण्यात आलं. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे १२ फेब्रुवारी जेव्हा लिलावाचा दिवस होता. त्यात आरसीबीनं श्रीलंकेच्या फिरकीपटू वानिंदु हसरंगासाठी १०.७५ कोटी मोजले आणि खरेदी केलं. पण चहलसाठी बोली लावण्याचेही कष्ट घेतले नाहीत. चहल २०१४ सालापासून आरसीबीच्या संघाचं प्रतिनिधीत्व करत होता. त्यानं आरसीबीकडून ११४ सामन्यांत १३९ विकेट्स घेतल्या आहेत. आरसीबी संघासाठी हा एक रेकॉर्ड आहे.