मुंबई :
युवा फलंदाज आयुष बदोनी याने दिल्लीविरुद्ध षटकार खेचून लखनौच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याआधी त्याने चेन्नईविरुद्धच्या विजयात फिनिशरची भूमिका बजावली होती. पहिल्या सामन्यातही आयुष तळाच्या स्थानावर येऊनही फलंदाजीत ठसा उमटविण्यात यशस्वी ठरला होता. चाहते त्याच्याकडे धोनीसारखा ‘फिनिशर’ म्हणून पाहू लागले आहेत.
बदोनीच्या खेळीची प्रशंसा कर्णधार राहलनेदेखील केली. बदोनी दडपणातही उत्कृष्ट खेळला. कुठल्याही परिस्थितीत त्याच्यात धावा काढण्याची क्षमता आहे. संधी मिळाली की तो सोने करतो. कुठल्याही स्थानावर फलंदाजीसाठी सज्ज असतो, असे राहुलने सांगितले.
गुरुवारी दिल्लीवरुद्ध आयुष तीन चेंडूत दहा धावा काढून नाबाद राहिला. तो खेळपट्टीवर आला तेव्हा लखनऊला ५ चेंडूत पाच धावांची गरज होती. बदोनीने तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि चौथ्या चेंडूवर षटकार खेचून सामना संपविला. चेन्नईविरुद्ध ९ चेंडूत १९ धावा काढून तो नाबाद राहिला होता. त्या वेळी त्याने दोन षटकार मारले.
अखेरच्या षटकात ९ धावांची गरज असताना षटकार मारून विजयावर शिक्कामोर्तब केले होते. चार सामन्यांत ५१ च्या सरासरीने त्याच्या १०२ धावा झाल्या असून त्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. स्ट्राईक रेट १५६.९२ इतका आहे. आयुषने पदार्पणाच्या सामन्यात गुजरातविरुद्ध ४१ चेंडूत ७ चौकारांसह ५४ धावा करीत अर्धशतकी खेळी केली होती.
विराटसारखेच सेलिब्रेशन...आयुषने काल दिल्लीविरुद्ध विजय साजरा करताच मैदानात विराटसारखे सेलिब्रेशन केले. हा व्हिडिओ व्हायरल झाला. विराट विजयानंतर स्वत:च्या हाताने नाव दर्शवितो तशीच कृती आयुषने केली. याआधी विराटने विंडीजविरुद्ध २०१९ ला हैदराबादमध्ये २०८ धावांचे लक्ष्य गाठून देत विराटने ५० चेंडूत नाबाद ९४ धावा ठोकताच अशा पद्धतीने सेलिब्रेशन केले होते.