IPL 2022 - कोरोना संकटामुळे पुन्हा एकदा इंडियन प्रीमिअर लीगवर ( Indian Premier League) परदेशात जाण्याची वेळ येताना दिसतेय, परंतु यावेळेस आयपीएल २०२२ हे महाराष्ट्रात खेळवण्याच्या हालचाली बीसीसीआयकडून सुरू झाल्या आहेत. बीसीसीआयनं प्लान ब म्हणून आयपीएल २०२२चे सर्व सामने महाराष्ट्रात खेळवता येतील का, यासाठी चाचपणी सुरू केली आहे. पण, आयपीएल २०२२ च्या मेगा ऑक्शननंतरच वेळापत्रकाबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.
टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआय वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम व नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर IPL 2022चे सामने खेळवण्यास इच्छुक आहेत. त्यांनी पुण्यातील गहुंजे स्टेडियमचा पर्याय म्हणून विचार केला आहे. या वृत्तानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व बीसीसीआय आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी बीसीसीआयला ग्रीन सिग्नल दिला आहे.
''५ जानेवारीला बीसीसीआयचे प्रभारी सीईओ आणि आयपीएलचे Chief Operating Officer हेमांग आमीन यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली. काही दिवसांनंतर आमीन व पाटील यांनी NCP प्रमुख पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. पवारांनी बीसीसीआयच्या या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल दाखवला आहे,''असे खात्रीशीर सूत्रांनी TOIला सांगितले.
''या आठवड्यात किंवा पुढील १० दिवसांत बीसीसीआय व मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेऊन स्पर्धेला आवश्यक परवानगी मिळावी अशी विनंती करणार आहेत. ही स्पर्धा स्ट्रीक बायो बबलमध्ये आणि प्रेक्षकांशिवाय खेळवली जाईल. खेळाडू व अधिकाऱ्यांची वारंवार चाचणी केली जाईल,''अशी माहितीही सूत्रांनी दिली. महाराष्ट्रात रविवारी ४४,००० नवे कोरोना रुग्ण सापडले आणि त्यापैकी २० हजार रुग्ण हे मुंबईतील होते. राज्य सरकारनं राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांना काटेकोर नियमांत खेळवण्याची परवानगी दिलेली आहे.
Web Title: IPL 2022: BCCI interim CEO meets MCA officials & Sharad Pawar to explore hosting of entire IPL 2022 in Maharashtra: Report
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.