Chennai Super Kings, MS Dhoni : IPL 2021 चा विजेता संघ चेन्नई सुपर किंग्स यांना एका मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कोट्यवधींची बोली लावून संघात दाखल करून घेतलेला स्टार क्रिकेटपटू दीपक चहर स्पर्धेच्या सुरूवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. वेस्ट इंडिजविरूद्धच्या टी२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात दीपक चहरच्या मांडीच्या स्नायूंना दुखापत झाली होती. त्यामुळे श्रीलंका विरूद्धच्या टी२० मालिकेला त्याला मुकावे लागले. तशातच तो अद्यापही पूर्णपणे तंदुरूस्त न झाल्याने IPL स्पर्धेतील बऱ्याचशा सामन्यांना त्याला मुकावे लागणार असल्याची शक्यता आहे.
दीपक चहरला चेन्नईच्या संघाने तब्बल १४ कोटींच्या बोलीवर संघात घेतले. काही बड्या खेळाडूंपेक्षाही त्याला जास्त किंमत मिळाली. त्यामुळे त्याच्या खेळीवर संपूर्ण लक्ष असणार होतं. पण दीपक चहर अजूनही फिट नसल्याने त्याला पूर्णपणे तंदुरूस्त होण्यासाठी आणखी काही आठवडे लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत २६ मार्च ते २९ मे या कालावधी दरम्यान सुरुवातीच्या बऱ्याच सामन्यांना त्याला मुकावे लागू शकते अशी चर्चा आहे.
दीपक चहर सध्या नॅशनल क्रिकेट अकादमीच्या रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये आहे. NCA कडून नक्की काय अहवाल येतो याकडे CSKचं लक्ष लागलं आहे. IPLच्या यंदाच्या मेगालिलावात दीपक चहर हा दुसऱ्या क्रमांकाचा महागडा खेळाडू ठरला होता. लिलावाच्या आधी झालेल्या श्रीलंका आणि आफ्रिका दौऱ्यावर चहरने अष्टपैलू खेळी करून दाखवली होती. तसेच, वेस्ट इंडिजविरूद्धच्या मालिकेतही एका सामन्यात त्याने दमदार खेळी केली होती. त्यामुळे त्याचा फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीत उपयोग होईल याचा विचार करूनच CSKने त्याला मोठी बोली लावत संघात स्थान दिले होते.