बंगळुरू - टीम इंडिया आणि चेन्नई सुपरकिंग्सचा वेगवान गोलंदाज दीपक चहर याच्या फिटनेसबाबत चिंता वाढवणारी बातमी येत आहे. दुखापतीमुळे दीपक चहर हा चार महिन्यांपर्यंत मैदानाबाहेर राहण्याची शक्यता आहे. दीपक चहर सध्या नॅशनक क्रिकेट अकादमी बंगळुरू येथे आहे. क्वाडिसेप्समधून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. नेट्समध्ये गोलंदाजी करताना त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो आयपीएलला मुकला होता. आता त्याच्या दुखापतीबाबत समोर आलेल्या नव्या माहितीमुळे तो ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये खेळवल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकालाही मुकणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेमध्ये दीपक चहला दुखापत झाली होती. त्यामुले त्याला आयपीएलमधून बाहेर व्हावे लागले होते. दरम्यान, नव्या दुखापतीने चिंता अधिकच वाढवली आहे.
यापूर्वी दीपक चहर हा आयपीएलच्या मध्यावर पूर्णपणे तंदुरुस्त होऊन चेन्नई सुपरकिंग्सच्या ताफ्यात दाखल होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र तसे होऊ शकले नाही. आयपीएलच्या लिलावामध्ये चेन्नईच्या संघाने १४ कोटी रुपये अशी भरभक्कम रक्कम मोजून खरेदी केले होते. मात्र नव्याने दुखापत झाल्याने आयपीएलमध्ये खेण्याच्या त्याच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे. स्कॅन करण्यात आल्यानंतर तो दीर्घकाळ संघाबाहेर राहू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे दीपक चहर टी-२० विश्वचषकातही खेळण्याची शक्यता कमी झाली आहे.
सीएसकेच्या संघव्यवस्थापनामधील एका सूत्राने हल्लीच प्रसारमाध्यमांना सांगितले होते की, आम्हाला दीपक चहरच्या पाठीला झालेल्या दुखापतीची माहिती नाही. तो आयपीएलमध्ये पुनरागमन करण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. मात्र सध्यातरी तो उपलब्ध होऊ शकत नाही. पण पाठीच्या दुखापतीमुळे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषकात खेळण्याच्या त्याच्या प्रयत्नांनाही धक्का बसला आहे.