IPL 2022 : गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) अखेर आनंदाची बातमी मिळाली आहे. CSK चा सलामवीर ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. CSK चे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ यांनी ही माहिती दिली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी ऋतुराजचे मनगट दुखावले गेले होते आणि त्यामुळे त्याला मालिकेतून माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर तो बीसीसीआयच्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल झाला होता.
CEO काशी विश्वनाथ यांनी सांगितले की, होय. ऋतुराज पहिला सामना खेळण्यासाठी तंदुरुस्त झाला आहे. त्याने संघासोबत सरावालाही सुरुवात केली आहे आणि तो निवडीसाठी उपलब्ध आहे.
ऋतुराजसोबत सलामीला कोण?फॅफ ड्यू प्लेसिस याला लिलावात पुन्हा ताफ्यात घेण्यात अपयश आल्यानंतर CSK साठी ओपनिंगला कोण येणार याची उत्सुकता साऱ्यांना लागली आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या डोक्यात नेमकी कोणती रणनीती शिजतेच हे तोच सांगू शकतो. तो कदाचित मोईन अली यालाही ओपनिंगला पाठवू शकतो. पण, मेगा ऑक्शनमध्ये CSKने न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉनवे याला १ कोटींत आपल्या ताफ्यात घेतले आणि तो CSKसाठी ओपनिंगचा सक्षम पर्याय ठरू शकतो. सराव सामन्यात संघाचे ऋतुराज व कॉनवे यांच्या जोडीची चाचपणी केली आहे. कॉनवेने २० आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यांत ५०.१६च्या सरासरीने ६०२ धावा केल्या आहेत आणि नाबाद ९९ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे.