मुंबई - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने जगातील इतर देशांबरोबरच भारतालाही धडक दिली आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोनाच्या या संकटामुळे आयपीएलला मोठा फटका बसला होता. २०२० मध्ये पूर्ण स्पर्धा भारताबाहेर यूएईमध्ये खेळवली गेली होती. तर २०२१ मध्ये स्पर्धेचा उत्तरार्ध भारताबाहेर यूएईमध्ये खेळवला गेला होता. त्यानंतर आता वाढत्या कोरोनामुळे आयपीएलच्या आयोजनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मात्र आयपीएलच्या २०२२ च्या हंगामासाठी बीसीसीआयने पूर्ण तयारी केली आहे. तसेच आयपीएलचा हा हंगाम यूएई नाही तर भारतातच आयोजित करण्याचा बीसीसीआयचा मानस आहे. कोरोनामुळे ही संपूर्ण स्पर्धा एकच शहरात आयोजित करण्याचा विचार असून, त्यासाठी मुंबईचे नाव आघाडीवर आहे.
आयपीएलच्या या हंगामात दोन नव्या संघांच्या समावेशामुळे एकूण १० संघ खेळणार आहे. अशा परिस्थितीत ही स्पर्धा १० शहरांमध्ये आयोजित करण्याचा बीसीसीआयचा विचार होता. मात्र कोरोनामुळे आता हे शक्य होईल असे वाटत नाही. त्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयकडून प्लॅन बी सज्ज ठेवण्यात येत आहे. तसेच ही संपूर्ण स्पर्धा मुंबईत खेळवली जाण्याची शक्यता आहे. तसेच हे सामने वानखेडे, ब्रेबॉर्न आणि डी.वाय. पाटील स्टेडियमवर खेळवले जाऊ शकतात.
सध्या बीसीसीआयसमोर दोन पर्याय आहेत. ते म्हणजे १० शहरांमध्ये सामने खेळवायचे किंवा संपूर्ण स्पर्धा मुंबईतील तीन स्टेडियममध्ये खेळवायची. दरम्यान, यावर्षी आयपीएलची सुरुवात मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते.
गेल्या हंगामाप्रमाणे यावेळी यूएईमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्याचा कुठलाही विचार नाही आहे. मात्र स्पर्धेची तारीख पुढे ढकलण्याचा विचार केला जाऊ शकतो. जर असे झाले तर यावेळी डबल हेडर सामन्यांची संख्या वाढणार आहे. दरम्यान, आयपीएलच्या १५ व्या हंगामासाठी मेगा ऑक्शन १२ आणि १३ फेब्रुवारीला बंगळुरूमध्ये होऊ शकते. मात्र कोरोनामुळे लागलेल्या निर्बंधांमुळे यात बदल होऊ शकतो.
Web Title: IPL 2022: Corona beats IPL again, but this time tournament can be played in Mumbai instead of UAE
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.