IPL 2022, Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सची धडपड सुरू आहे. पुण्यातील स्टेडियमवर आज त्यांचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी ( RCB) होत आहे. RCBलाही हा सामना जिंकणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे दोन्ही संघ संपूर्ण तयारीने मैदानावर उतरले आहेत. पुण्यातील मागील सामन्यात CSKचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड व डेवॉन कॉनवे यांनी १८२ धावांची विक्रमी भागीदारी करताना धावांचा पाऊस पाडला होता. तरीही आज कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्याच सामन्यात ड्रामा पाहायला मिळाला.
मिचेल सँटनरच्या जागेवर आज मोईन अलीचे संघात पुनरागमन झाले. RCBकडून आज खेळण्यासाठी दिनेश कार्तिक फिट आहे का, याची उत्सुकता होती आणि तो तंदुरुस्त आहे. महेंद्रसिंग धोनीने आतापर्यंत CSK कडून १९९ आयपीएल सामने खेळले आहेत आणि आजचा त्याचा २०० वा सामना आहे. त्याने आयपीएलमधील एकूण २२९ पैकी ३० सामन्यांत रायझिंग पुणे जायंट्सचे प्रतिनिधित्व केले आहे. मागील सामन्यात चार विकेट्स घेणाऱ्या मुकेश चौधरीने डावाची सुरुवात केली. पहिल्या षटकात त्याने ६ धावा देताना CSK ला सकारात्मक सुरुवात करून दिली.
या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर मात्र थोडा ड्रामा रंगला. मुकेशने टाकलेला चेंडू विराटने सरळ मारला आणि तो गोलंदाजाच्या हातात टप्पा खावून विसावला. तोपर्यंत विराट क्रिज सोडून बराच पुढे आला होता आणि त्यामुळे मुकेशने त्याला Run Out करण्याच्या प्रयत्नासाठी चेंडू त्याच्या दिशेने पुन्हा टाकला. विराट माघारी फिरला, परंतु तो चेंडू त्याला लागला. त्यानंतर मुकेशने विराटची माफी मागितली आणि विराटनेही हसून त्याला थम्प्स अप केले. ( पाहा IPL 2022 - RCB vs CSK सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड )