IPL 2022, Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स यांच्यातला सामना कमालीचा चुरशीचा झाला. १७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड व डेवॉन कॉनवे यांनी दमदार सुरूवात केली. पण, ग्लेन मॅक्सवेलने दिलेले दोन अनपेक्षित धक्के, त्यानंतर वनिंदू हसरंगा व हर्षल पटेल ( 3-35) यांनी मोक्याच्या क्षणाला महत्त्वाच्या विकेट घेत RCBला दमदार पुनरागमन करून दिले. महेंद्रसिंग धोनीची ( MS Dhoni) जादूही कामी आली नाही आणि RCB ने मॅच जिंकून प्ले ऑफच्या शर्यतीतील आव्हान जीवंत ठेवले. या विजयासह RCB ने गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली.
पुण्यात खेळलेल्या मागील लढतीत १८२ धावांची भागीदारी करणाऱ्या ऋतुराज गायकवाड व डेवॉन कॉनवे यांच्यासाठी १७४ धावांचे लक्ष्य म्हणजे काहीच नव्हते. फॉर्मात असलेल्या फलंदाजांनी सुरुवातीला सावध खेळ केला अन् स्थिरावल्यानंतर फटकेबाजी सुरू केली. या दोघांची ५४ धावांची भागीदारी शाहबाज अहमदने संपुष्टात आणली. ऋतुराज २८ धावांवर बाद झाला. पाठोपाठ रॉबिन उथप्पाही ( १) ग्लेन मॅक्सवेलच्या पहिल्याच षटकात विकेट देऊन बसला.अंबाती रायुडूलाही ( १०) त्रिफळाचीत करून मॅक्सवेलने RCBला मोठे यश मिळवून दिले. ( पाहा IPL 2022 - RCB vs CSK सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड )
मोईन अली व कॉनवे यांची ३४ धावांची भागीदारी वनिंदू हसरंगाने संपुष्टात आणली. स्वीप मारण्याच्या प्रयत्नात कॉनवे झेलबाद झाला. त्याने ३७ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ५६ धावा केल्या. वनिंदूने पहिल्या चेंडूवर विकेट मिळवल्यानंतर अलीने त्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून CSKचे दडपण कमी केले. चेन्नईला ३० चेंडूंत ५६ धावा करायच्या होत्या. रवींद्र जडेजाला आज मॅचविनिंग खेळण्याची संधी होती, परंतु हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर तो ( ३) विराटच्या हाती झेल देऊन माघारी परतला. जडेजाच्या विकेटनंतर CSKला १८ चेंडूंत ४७ धावा करायच्या होत्या.
१८व्या षटकात मोईन अलीने पहिलाच चेंडू षटकार खेचला, परंतु हर्षल पटेलनं पुढील चेंडू थोडा संथ वेगाने टाकला अन् अली झेलबाद झाली. अलीने २७ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ३४ धावा केल्या. पटेलने १८व्या षटकात ८ धावा देत १ विकेट घेतली आता अन् CSKला १२ चेंडूंत ३९ धावांची गरज होती. जोश हेझलूवडच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात धोनी ( २) माघारी परतला अन् CSKच्या चाहत्यांना विजयाच्या आशा सोडल्या. ६ चेंडूंत ३१ धावांची गरज असताना ड्वेन प्रेटोरियनसने षटकार खेचला, परंतु पुन्हा पुढील चेंडूवर हर्षलने चतुराईने त्याची विकेट घेतली. चेन्नईला ८ बाद १६० धावाच करता आल्या आणि बंगळुरूने १३ धावांनी सामना जिंकला.
प्रथम फलंदाजीला आलेल्या बंगळुरूला विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी सुरुवात तर चांगली करून दिली. आयपीएल २०२२मध्ये या दोघांनी प्रथमच अर्धशतकी भागीदारी केली. पण, पुनरागमन करणाऱ्या मोईन अलीने RCBला पहिला धक्का दिला. ३८ धावांवर खेळणाऱ्या फॅफची विकेट त्याने घेतली. त्यानंतर आलेला ग्लेन मॅक्सवेल ( ३) रन आऊट झाला. मोईन अलीने टाकलेला अप्रतिम चेंडू विराटच्या ( ३०) यष्टींचा वेध घेऊन गेला. महिपाल लोम्रोर व रजत पाटिदार यांच्या ४४ धावांच्या भागीदारीने RCB ला आधार दिला. ड्वेन प्रेटोरियसने १६व्या षटकात रजतला २१ धावांवर बाद केले.
१९व्या षटकात महिपालचे वादळ महीश थिक्सानाने रोखले. महिपाल २७ चेंडूंत ३ चौकार व २ षटकार खेचून ४२ धावांवर माघारी परतला. थिक्सानाने त्या षटकात वनिंदू हसरंगा ( ०) व शाहबाज अहमद ( १) यांची विकेट घेतली. थिक्सानाने ४ षटकांत २७ धावांत ३ बळी टिपले. दिनेश कार्तिकने अखेरच्या षटकात १६ धावा केल्या आणि RCB ने ८ बाद १७३ धावा केल्या. कार्तिक १७ चेंडूंत २६ धावांवर नाबाद राहिला.