Join us  

Ravindra Jadeja IPL 2022 CSK vs RCB Live Updates : Robin, Shivam अन् Maheesh यांची दमदार कामगिरी, चेन्नई सुपर किंग्सने अखेर पहिला विजय मिळवला

IPL 2022  Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live Updates : महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली हे दोन दिग्गज एकमेकांसमोर उभे ठाकणार अन् चाहत्यांच्या आनंदाला उधाण नाही येणार असे होणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 11:32 PM

Open in App

IPL 2022  Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live Updates : महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली हे दोन दिग्गज एकमेकांसमोर उभे ठाकणार अन् चाहत्यांच्या आनंदाला उधाण नाही येणार असे होणार नाही. नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर CSK vs RCB सामना मैदानावर सुरू होता, तर तो प्रेक्षकांमध्येही सुरू होताच. पण, सलग चार पराभव पत्करलेल्या CSKने जोरदार मुसंडी मारून IPL 2022त अखेर विजयाची चव चाखली अन् CSKच्या चाहत्यांनी जल्लोष करत स्टेडियम दणाणून सोडले. रॉबिन उथप्पा ( Robin Uthappa ) व शिवम दुबे  ( Shivam Dube ) या जोडीने चौकार-षटकारांची आतषबाजी करून CSKच्या विजयाचा मजबूत पाया रचला. या दोघांचे शतक झाले असते तर आणखी मजा आली असती. दिनेश कार्तिकने ( Dinesh Karthik) फटकेबाजी करून CSKची धाकधुक वाढवली होती, पण लक्ष्य अधिक असल्याने तोही अपयशी ठरला.  ऋतुराज गायकवाड ( 17) व मोईन अली ( 3) झटपट माघारी परतल्याने चेन्नईची अवस्था 2 बाद 36 अशी झाली. रॉबिन उथप्पा व शिवम दुबे यांनी दमदार खेळ केला. 81 धावांवर असताना उथप्पाला जीवदान मिळाले. उथप्पा व दुबे यांनी RCB विरुद्ध तिसऱ्या विकेटसाठीही सर्वोत्तम भागीदारीची नोंद केली. याआधी केन विलियम्सन व मनीष पांडे यांनी 2018मध्ये 135 धावा चोपल्या होत्या. उथप्पा 50 चेंडूंत 4 चौकार व 9 षटकारांसह 89 धावांवर बाद झाला. दुबे व उथप्पा यांची 165 धावांची भागीदारी ही आयपीएलमधील तिसऱ्या विकेटसाठीची सर्वोत्तम भागीदारी ठरली. त्यांनी कुमार संगकारा व कॅमेरून व्हाईट यांची 2012साली नोंदवलेली 157 धावांचा विक्रम मोडला.  दुबे 46 चेंडूंत 5 चौकार व 8 षटकारांसह 95  धावांवर  नाबाद राहिला. चेन्नईने 4 बाद 216 धावा केल्या.  

माहीश थिक्सानाने प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या RCBच्या दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात बाद केले. फॅफ ड्यू प्लेसिस (8) व अनुज रावत ( 12) माघारी परतल्यावर विराट कोहली मैदानावर आला, परंतु तो 3 चेंडूंचा पाहुणा बनला. मुकेश चौधरीच्या गोलंदाजीवर तो ( 1) दुबेच्या हाती झेल देऊन माघारी परतला. ग्लेन मॅक्सवेलला जीवदान मिळाले, परंतु रवींद्र जडेजाने त्याचा त्रिफळा उडवला. मॅक्सवेलची पत्नी विनी रमण ( Vini Raman) स्टेडियमवर उपस्थित होती. मॅक्सवेल 11 चेंडूंत 2 चौकार व 2 षटकारांसह 26 धावांवर बाद झाल्याने RCBची अवस्था 4 बाद 50 अशी झाली. पदार्पणवीर सुयष प्रभुदेसाई व शाहबाज अहमद यांनी धावांची गती कमी होऊ दिली नाही. या दोघांनी 33 चेंडूंत 60 धावा जोडल्या.

चेन्नईच्या खेळाडूंकडूनही झेल सुटले, परंतु गोलंदाजांनी त्याची लगेच भरपाई केली. थिक्सानाने या सेट झालेल्या फलंदाजांना बाद केले. प्रभुदेसाई 18 चेंडूंत 35 धावांवर, तर अहमद 27 चेंडूंत 41 धावांवर थिक्सानाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाले. RCBला 30 चेंडूंत 77 धावा करायच्या असताना 16व्या षटकाचा पहिला चेंडू वनिंदू हसरंगाने षटकार खेचला, परंतु रवींद्र जडेजाने चतुराने पुढच्याच चेंडूवर त्याची विकेट घेतली. याच षटकात आकाश दीपचा अफलातून झेल अंबाती रायुडूने पकडला. इथून बंगळुरूचा विजय अशक्यच वाटत होता, पण दिनेश कार्तिक मैदानावर असल्याने चाहत्यांना अजूनही आस होती. 6 धावांवर असताना कार्तिकचा सोपा झेल सोडणे मुकेश चौधरीलाच महागात पडले. त्याच्या 17व्या षटकात कार्तिकने 23 धावा कुटल्या. 18 चेंडूंत 48 धावा RCBला करायच्या होत्या, परंतु त्यांच्याकडे कार्तिकशिवाय फलंदाजीत दुसरा सक्षम पर्याय नव्हता. 8 विकेट्स गमावल्यामुळे त्यांच्यावर अधिक दडपण होते. तिक्सानाने 33 धावांत 4, जडेजाने 39 धावांत 3 विकेट्स घेतल्या. 18व्या षटकात ड्वेन ब्राव्होने CSKला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. कार्तिक 14 चेंडूंत 2 चौकार व 3 षटकरांसह 34 धावांवर जडेजाकरवी झेलबाद झाला. इथेच RCBचा खेळ खल्लास झाला. आता केवळ औपचारिकता राहिली होती. RCB ने 9 बाद 193 धावा केल्या. चेन्नईने 23 धावांनी सामना जिंकला.  

टॅग्स :आयपीएल २०२२चेन्नई सुपर किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App