IPL 2022, Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी संघर्ष करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सने ( CSK) आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ( RCB) कडवी टक्कर दिली आहे. विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी चांगली सुरूवात करून दिली, परंतु मोईन अलीने सामन्याला कलाटणी दिली. विराट ( Virat Kohli) ला त्याने ७ अंश कोनातून चेंडू वळवून त्रिफळाचीत केले. ३० धावांवर माघारी परतलेल्या विराटने मात्र आज सुरेश रैनाचा ( Suresh Raina) मोठा विक्रम मोडला.
मागील सामन्यात चार विकेट्स घेणाऱ्या मुकेश चौधरीने डावाची सुरुवात केली. पहिल्या षटकात त्याने ६ धावा देताना CSK ला सकारात्मक सुरुवात करून दिली.विराट व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी त्यानंतर CSKच्या गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरुवात केली. आयपीएल २०२२मधील विराट व फॅफने प्रथमच अर्धशतकी भागीदारी केली. आजच्या सामन्यात पुनरागमन करणाऱ्या मोईन अलीने ( Moeen Ali) सामन्याला कलाटणी दिली. अलीने त्याच्या पहिल्याच षटकात फॅफची विकेट घेतली. २२ चेंडूंत ४ चौकार व १ षटकार खेचून फॅफ ३८ धावांवर माघारी परतला. त्यानंतर आलेला ग्लेन मॅक्सवेल ( ३) विराटकडून चुकीचा कॉल मिळाल्याने रन आऊट झाला.
आता विराटवरच सर्व भिस्त होती, परंतु अली विश्रांती घेऊन पूर्णपणे चार्ज होऊन आलेला. त्याने टाकलेला अप्रतिम चेंडू विराटच्या यष्टिंचा वेध घेऊन गेला. विराट ३३ चेंडूंत ३० धावांवर त्रिफळाचीत झाला. विराटने या खेळीत ३ चौकार व १ षटकार लगावला. त्याचा हा षटकार सुरेश रैनाचा विक्रम मोडणारा ठरला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीयांमध्ये विराट दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. ( पाहा IPL 2022 - RCB vs CSK सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड )
- रोहित शर्मा - ४२९ षटकार
- विराट कोहली - ३२६ षटकार
- सुरेश रैना - ३२५ षटकार
- महेंद्रसिंग धोनी -३१० षटकार
- शिखर धवन - २०८ षटकार