IPL 2022 Chennai Super Kings vs Rajasthan Royals Live Updates : महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) पुढील आयपीएलमध्ये खेळणार असल्याचे जाहीर केल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सला ( CSK ) बूस्टर डोस मिळाला. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या कॅप्टन धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाड ( २) पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर बाद झाल्यानंतर मोईन अलीने ( Moeen Ali) राजस्थानच्या नाकी नऊ आणले. पहिल्या सहा षटकांत १ बाद ७५ धावा चोपून CSK ने प्ले ऑफमधील यंदाची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. पण, त्यानंतर राजस्थानच्या गोलंदाजाने दणके देताना दमदार कमबॅक केले...
प्रसिद्ध कृष्णाने टाकलेल्या चौथ्या षटकात अलीने १८ धावा कुटल्या. त्यानंतर पुढील षटकात त्याने आर अश्विनला टार्गेट केले आणि १५ धावा चोपल्या. अली व कॉनवे यांनी २५ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. अलीने सहाव्या षटकात बोल्टला धु धु धुतले. 6, 4, 4, 4, 4, 4 अशा २६ धावा चोपल्या. अलीने १९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि आयपीएल २०२२मधीले हे दुसरे जलद अर्धशतक ठरले. पॅट कमिन्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध १४ चेंडूंत अर्धशतक झळकावले होते. चेन्नईने पहिल्या ६ षटकांत १ बाद ७५ धावा केल्या. चेन्नईकडूनही ही दुसरी सर्वात जलद अर्धशतकी खेळी ठरली. सुरेश रैनाने २०१४मध्ये पंजाबविरुद्ध १६ चेंडूंत ५० धावा केल्या होत्या. अलीने आज महेंद्रसिंग धोनीचा २०१२ ( २० चेंडू वि. मुंबई ) विक्रम मोडला.